
इस्लामाबाद, 05 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओके) मध्ये सरकारच्या कठोर कारवाईनंतर आणि ६०० हून अधिक नागरी हक्क कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर अटक केल्यानंतर पाकिस्तानविरोधी तीव्र आंदोलनाला सुरुवात झाली आहे.प्रमुख आंदोलन नेते शौकत नवाज मीर यांना नजरकैदेत ठेवल्यानंतर संतप्त झालेल्या जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (जेएएसी) ने इस्लामाबादला उघड आव्हान देत भारताकडे मदतीची मागणी केली आहे.
आपल्या नेत्यांच्या अटकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत जेएएसी ने म्हटले, “गुलाम त्यांच्या ताब्यात आहेत. शाह कैदेत आहेत.”पाकिस्तानी प्रशासनाखालील तीव्र टंचाई, संघटित दडपशाही आणि गंभीर मानवी संकटावर प्रकाश टाकणारा जम्मू-काश्मीर जेएएसी चे प्रमुख सदस्य सरदार अमन खान यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.एका व्हायरल व्हिडिओमध्ये सरदार अमन खान सभेला संबोधित करत म्हणतात, “मेंढर, पुंछ, राजौरी आणि डोडा येथील लोकांना… आम्ही तिकडील लोकांना आवाहन करतो. या बाजूला अन्नधान्याची कमतरता आहे, औषधांची टंचाई आहे आणि आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. आम्हाला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे.”
पाकिस्तानच्या नियंत्रणातून बाहेर पडण्याची स्थानिकांची तीव्र इच्छा व्यक्त करत जेएएसी नेत्यांनी नियंत्रण रेषा (LoC) हटवण्याची मागणी केली. त्यांनी सीमापारच्या लोकांना संदेश देत म्हटले, “आम्हाला सीजफायर लाईन संपवायची आहे आणि त्यासाठी तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. सीमापारच्या लोकांनी पुढे यावे, अशी माझी विनंती आहे. आम्ही राजकीय संवादासाठी दार उघडे ठेवले आहे.”
पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या मनमानीवर टीका करत अमन खान यांनी इशारा दिला की, स्थानिक जनता आता इस्लामाबादच्या धमक्यांना घाबरणार नाही.ते म्हणाले, “जर कुणाला आमच्या संयमाला आमची कमजोरी समजत असेल, तर तो गैरसमज आहे. कोणीही अडकलेले नाही. अल्लाहची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू. त्यानंतर तुम्हाला सर्व मार्ग दिसतील. आम्ही तुम्हाला दाखवू की मार्ग कुठे आहेत.”
आणखी एका व्हायरल व्हिडिओमध्ये सुरक्षा व्यवस्थेला थेट आव्हान देत अमन खान यांनी आंदोलनकर्त्यांना विचारले, “आपण नियंत्रण रेषेकडे कूच करावे का? यावर उपस्थित जमावाने जोरदार “हो!” अशी घोषणा दिली.शांततापूर्ण आंदोलनावर हिंसक कारवाई झाल्यास त्याला प्रत्युत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला. खान म्हणाले, “कश्मीरी जनतेच्या भावना आणि राजकीय भूमिकेला उत्तर म्हणून जर गोळीबार झाला, तर आमच्याकडेही पर्याय आहेत. उद्या तक्रार करू नका, पश्चात्ताप करू नका.”
भाषणाच्या शेवटी त्यांनी पाकिस्तानच्या कारभाराखालील दडपशाहीचा उल्लेख करत म्हटले, “आम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे वागणारे लोक नाही. तुम्ही निष्ठा दाखवाल तर आम्हीही निष्ठा दाखवू. तुम्ही क्रूरता दाखवाल तर आम्हीही त्याच प्रकारे उत्तर देऊ. आम्हीही तुमच्यासारखेच माणसं आहोत. तुम्ही जे कराल, त्याला आम्ही तसंच प्रत्युत्तर देऊ, अल्लाहची इच्छा असेल तर.”
दरम्यान, काल प्रसिद्ध झालेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये अमन खान म्हणाले, “मी काश्मीर खोऱ्यातील लोकांशी, विशेषतः श्रीनगर, बारामुल्ला आणि आसपासच्या जिल्ह्यांतील नागरिकांशी संवाद साधत आहे. तसेच पुंछ, मेंढर, राजौरी, जम्मू, लडाख, कारगिल, गिलगिट-बाल्टिस्तान आणि संपूर्ण जम्मू-काश्मीरमधील जनतेलाही मी संबोधित करत आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की, पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या जवळपास महिनाभरापासून प्रचंड दडपशाही आणि अत्याचार सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode