
बीजिंग , 09 जुलै (हिं.स.)।दक्षिण चीनमध्ये ‘मेसाक’ या उष्णकटिबंधीय वादळामुळे आलेल्या भीषण पुराने मोठी हानी केली आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
शहराचे उपमहापौर डिंग वेई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बहुतांश मृत्यू ग्वांग्शी प्रदेशातील नाननिंग शहरात धरण फुटल्यामुळे झाले. या एकाच दुर्घटनेत २६ जणांचा मृत्यू झाला.
पूर आणि धरण फुटीच्या या भीषण आपत्तीनंतर स्थानिक प्रशासन, बचाव पथके आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी प्रभावित भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर मदत व बचावकार्य सुरू केले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक भाग अजूनही पाण्याखाली असल्याने मदतकार्य करताना अडचणी येत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे आणि आवश्यक मदत पुरविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, चीनच्या हवामान विभागाने इशारा दिला आहे की ‘मेसाक’ वादळाच्या प्रभावामुळे दक्षिण चीनमधील अनेक भागांत पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहू शकतो. प्रशासनाने सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच संभाव्य भूस्खलन आणि अचानक पूर येण्याचा धोका लक्षात घेऊन देखरेख वाढविण्यात आली आहे.
मेसाक’ (मायसाक) हे पश्चिम प्रशांत महासागर आणि दक्षिण चीन समुद्रात निर्माण होणारे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. एखाद्या उष्णकटिबंधीय प्रणालीतील सतत वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी सुमारे ६३ ते ११८ किलोमीटर दरम्यान पोहोचला की, त्याला ‘ट्रॉपिकल स्टॉर्म’ अर्थात उष्णकटिबंधीय वादळ म्हटले जाते. यापेक्षा अधिक वेगाने वारे वाहू लागल्यास त्याचे रूपांतर ‘टायफून’मध्ये होते.
२०२६ मधील ‘मेसाक’ वादळ दक्षिण चीन समुद्रात तयार झाले आणि त्यानंतर हैनान बेट ओलांडून दक्षिण चीनच्या दिशेने सरकले. या वादळासोबत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यांमुळे ग्वांग्शीसह आसपासच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर काही ठिकाणी धरणे फुटल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode