
इस्लामाबाद, 09 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) मध्ये वाढत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्याकडून आंदोलनकर्त्यांची सातत्याने हत्या केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. राजकीय प्रतिनिधित्व आणि घटनात्मक अधिकारांची मागणी करताना मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना पाकिस्तानने आता दहशतवादी ठरवण्यास सुरुवात केली आहे.
रावळकोटपासून मुजफ्फराबाद, मीरपूर, कोटली, बाग, हट्टियान बाला, सुधनोती, ढेरकोट आणि डड्यालपर्यंत आंदोलनकर्त्यांवर क्रूर अत्याचार होत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच महिलांवर आणि तरुणींवर पाकिस्तानी सैन्याकडून अत्याचार होत असल्याचे आरोप आहेत. सुमारे शंभरहून अधिक तरुणी घरातून बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे शौकत नवाज मीर, मेहरान अरशद ख्वाजा, अमन खान आणि अमजद अली यांनाही पाकिस्तानने दहशतवादी घोषित केले आहे.
रावळकोट हे आंदोलनाचे सर्वात मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. गेल्या एका महिन्यात पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षांमध्ये आतापर्यंत २५ युवकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त अवामी ॲक्शन कमिटी (जेएएसी)ने दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादकडून सतत असे निर्णय लादले जात आहेत ज्यामध्ये पीओकेतील जनतेच्या मतांची आणि हितांची उपेक्षा केली जात आहे. “आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या हक्कांची मागणी करत आहोत, परंतु त्याबदल्यात आम्हाला गोळ्या घालून ठार मारले जात आहे,” असे समितीचे म्हणणे आहे.
पाकिस्तानने आंदोलन दडपण्यासाठी प्रथम जेएएसीवर बंदी घातली, वरिष्ठ नेत्यांना अटक केली, अतिरिक्त सुरक्षा दलांची तैनाती केली आणि आता मृत आंदोलनकर्त्यांनाही दहशतवादी ठरवण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तान सरकार जेएएसीची तुलना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) यांसारख्या संघटनांशी करत आहे.
पाकिस्तानी सैन्याचा आरोप आहे की या तिन्ही संघटना एकत्र येऊन देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे, आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की ही लढाई त्यांच्या राजकीय अधिकारांसाठी, स्थानिक ओळखीसाठी आणि लोकशाहीतील सहभागासाठी आहे. त्यामुळे ते सातत्याने भारत सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत.
रावळकोटमध्ये आंदोलनाचे सर्वात मोठे केंद्र, जिथे सर्वाधिक हिंसक संघर्ष होत आहेत.मुजफ्फराबाद राजधानी क्षेत्र, जिथे मोठ्या संख्येने लोक मोर्चे आणि धरणांमध्ये सहभागी होत आहेत. मीरपूर आणि कोटली बाजारपेठा बंद, चक्का जाम आणि मोठ्या प्रमाणावर रॅलींचे आयोजन करण्यात आले.बाग, हट्टियान बाला आणि सुधनोती येथे स्थानिक पातळीवर व्यापक आंदोलन आणि निदर्शने सुरु आहेत. ढेरकोट आणि डड्यालमध्ये रस्ते रोको, धरणे आणि पाकिस्तान सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode