
वॉशिंग्टन, 09 जुलै (हिं.स.)।अमेरिकन सैन्याने बुधवारी रात्री पुन्हा इराणवर नव्या हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे.अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने दावा केला की, त्यांनी इराणच्या सुमारे 90 लष्करी तळांना लक्ष्य केले. त्यांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर होणारे इराणी हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे, इराणच्या सरकारी वृत्तसंस्थाने सांगितले की, खुजेस्तान प्रांतातील अहवाज शहराच्या बाहेरील भागात झालेल्या हल्ल्यात 3 लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनानुसार, मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
सेंटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्याने इराणमधील सुमारे ९० लष्करी तळांना लक्ष्य केले. यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवरील देखरेखीसाठी वापरली जाणारी उपकरणे, क्षेपणास्त्र आणि ड्रोन साठवण केंद्रे, नौदलाशी संबंधित तळ तसेच इराणच्या समुद्रकिनारी असलेली लष्करी रसद (लॉजिस्टिक्स) पायाभूत सुविधा यांचा समावेश होता.अमेरिकन सैन्याचा दावा आहे की, या हल्ल्यांमुळे इराणच्या नौदल क्षमतेला मोठा फटका बसला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इराणवरील हल्ल्याचा व्हिडीओ आणि एक पोस्ट शेअर केली. त्यात म्हटले आहे की, स्थानिक अधिकाऱ्यांनी आता पुष्टी केली आहे की अमेरिकन हल्ल्यांमध्ये इराणच्या आग्नेयेकडील शहरातील विमानतळ आणि हवाई तळाला लक्ष्य करण्यात आले होते. या तळाचा वापर इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स एरोस्पेस फोर्सकडून केला जात असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान इराणच्या वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, बंदर अब्बास आणि सीरिक येथे जोरदार स्फोट झाले. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे, तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. अहवालांनुसार, चाबहार आणि कोनारक येथे अमेरिकन सैन्याने हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमुळे चाबहारमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच, एका वृत्तानुसार अमेरिकन सैन्याने अक्काला येथील रेल्वे पूल उडवून दिला आहे.
मंगळवारी इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत तीन मालवाहू जहाजांवर हल्ला केला होता. त्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकेने इराणमधील विविध लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. दरम्यान, इराणकडूनही अमेरिकन हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. वृत्तानुसार, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने म्हटले आहे की, प्रत्युत्तरात्मक कारवाईच्या पहिल्या टप्प्यात कुवेतमधील अमेरिकन छावणी ‘कॅम्प अरिफजान’ आणि ‘अली अल सलेम’ हवाई तळ, तसेच बहरीनमधील ‘जुफैर’ आणि ‘शेख ईसा’ हवाई तळांवरील अमेरिकन ठिकाणांवर संयुक्तपणे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यात आले.त्यानंतर अमेरिकेने ही प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. आग्नेय इराणमधील इरानशहर विमानतळावर अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यात एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारी माध्यमांच्या वृत्तानुसार, बंदर अब्बास येथे आठ स्फोटांचे आवाज ऐकू आले. इराणच्या सरकारी दूरदर्शनने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या नव्या हल्ल्यांनंतर हे स्फोट झाले. अहवालानुसार, दोन क्षेपणास्त्रे सीरिक बंदर परिसरात पडली, तर आणखी दोन क्षेपणास्त्रांचे स्फोट जास्क बंदरात झाले. या हल्ल्यांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, इराण अशोभनीय भाषेला शब्दांनी नव्हे तर कृतीतून उत्तर देतो.ते म्हणाले, “ट्रम्प यांची विधाने इराणी जनतेचे महानत्व, स्वाभिमान आणि दृढनिश्चय कमी करू शकत नाहीत.”त्यांनी पुढे स्पष्ट केले की, इराण आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि कोणत्याही दबावाला किंवा अपमानास्पद वक्तव्यांना झुकणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode