
पुणे, 01 ऑगस्ट (हिं.स.)पुण्यात आयोजित विशेष सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना शाह यांनी लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादी विचारांचा गौरव करत त्यांच्या 'गीतारहस्य' ग्रंथाचे महत्त्व अधोरेखित केले.
अमित शाह म्हणाले, मला लोकमान्य टिळकांचा 'गीतारहस्य' हा ग्रंथ गुजराती भाषेत वाचण्याची संधी मिळाली. हा ग्रंथ म्हणजे भगवद्गीतेचे व्यवहारिक स्वरूप असून, सामान्य माणसाने गीतेतील विचार दैनंदिन जीवनात कसे आचरणात आणावेत, याचे उत्कृष्ट मार्गदर्शन त्यामध्ये आहे. देशातील प्रत्येक तरुणाने हा ग्रंथ अवश्य वाचावा. 'गीतारहस्य' वाचल्यानंतर आयुष्यात योग्य निर्णय घेण्याची दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकमान्य टिळकांच्या पत्रकारितेच्या योगदानाचा उल्लेख करत शाह म्हणाले की, इंग्रज सत्तेला सर्वाधिक धास्ती वाटणारी 'केसरी' आणि 'मराठा' ही वृत्तपत्रे टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याचे प्रभावी माध्यम बनवली. या माध्यमांतून त्यांनी राष्ट्रभावना जागृत केली आणि स्वातंत्र्याची प्रेरणा जनमानसात रुजवली.शाह यांनी पुढे सांगितले की, लोकमान्य टिळकांचा विश्वास असा होता की राष्ट्राची चेतना जागृत झाल्याशिवाय स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त होत नाही. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीसारख्या उत्सवांद्वारे समाजाला एकत्र आणण्याचे ऐतिहासिक कार्य टिळकांनी केले आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक बळकट केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु