ग्लोबल कमोडिटी कॉन्क्लेव्ह 2026 कमोडिटी बाजारपेठांच्या भविष्याला देणार आकार
मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.)। जागतिक कमोडिटी बाजारपेठांना दिशा देण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या दिशेने भारत निर्णायक पाऊल टाकत आहे. एमसीएक्सच्या सहकार्याने कमोडिटी मार्केट्स इंडस्ट्रीतर्फे 12–14 ऑगस्ट 2026 या कालावधीत मुंबईतील जिओ वर्ल्
मुंबई


मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.)। जागतिक कमोडिटी बाजारपेठांना दिशा देण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या दिशेने भारत निर्णायक पाऊल टाकत आहे. एमसीएक्सच्या सहकार्याने कमोडिटी मार्केट्स इंडस्ट्रीतर्फे 12–14 ऑगस्ट 2026 या कालावधीत मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ग्लोबल कमोडिटी कॉन्क्लेव्ह 2026 आयोजित करण्यात येणार आहे. भारताला किंमत निर्धारक म्हणून विकसित करण्याच्या दिशेने गती देण्यासाठी तयार करण्यात आलेला हा अशा प्रकारचा पहिलाच प्लॅटफॉर्म आहे.

प्रत्यक्ष वस्तूंची बाजारपेठ आणि वित्तीय बाजारपेठ यांच्यातील वाढता परस्परसंबंध, समन्वय आणि एकत्रित कार्यप्रणाली या संकल्पनेवर आधारित या तीन दिवसांच्या परिषदेत धोरणकर्ते, जागतिक एक्स्चेंजेस, बाजार पायाभूत सुविधा क्षेत्रातील नेते, संस्थात्मक गुंतवणूकदार, कॉर्पोरेट्स, एसएमई, वित्तीय संस्था आणि किरकोळ व्यापारी एकाच व्यासपीठावर सहभागी होणार आहेत. भारतीय कमोडिटी बाजारपेठांच्या इतिहासातील हा सर्वात व्यापक मेळावा ठरणार आहे.

कमोडिटी बाजारपेठा सातत्याने बदलत असताना प्रभावी जोखीम व्यवस्थापन आणि वैविध्यपूर्ण गुंतवणूक धोरणांचे महत्त्व व्यवसाय आणि गुंतवणूकदारांसाठी अधिक वाढत आहे. या परिषदेतून बाजारपेठेची लवचिकता वाढविणे आणि नव्या वाढीच्या संधी निर्माण करण्यातील कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जची वाढती भूमिका अधोरेखित केली जाणार आहे.

किंमत निर्धारक बनण्याच्या दिशेने

भारतीय कमोडिटी बाजारपेठा सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. प्रगत नियामक सुधारणांमुळे आणि वेगाने विस्तारत असलेल्या देशांतर्गत प्रत्यक्ष वस्तूंच्या बाजारपेठेच्या बळावर भारत जागतिक कमोडिटी परिसंस्थेतील प्रभावी शक्ती म्हणून सातत्याने स्वतःची ओळख निर्माण करत आहे.

परिषदेचा मुख्य धोरणात्मक मंत्र (प्राइस इन इंडिया, हेज इन इंडिया) “किंमत भारतात ठरवा, किंमत जोखमीपासून संरक्षणही भारतातच करा” हा कृषी, धातू आणि ऊर्जा क्षेत्रांतील पुरवठा साखळी अधिक सुरक्षित करण्यासाठी सक्षम देशांतर्गत डेरिव्हेटिव्ह्ज बाजारपेठा कशा महत्त्वाच्या ठरू शकतात यावर चर्चा घडवून आणणार आहे. भारतातील औद्योगिक केंद्रांमधील उत्पादन क्षेत्रातील एमएसएमईंसाठी या परिषदेत सेकंडरी अॅल्युमिनियम, कॉपर स्क्रॅप आणि झिंक बाजारपेठेतील वास्तव परिस्थितीवर आधारित व्यावहारिक आणि कृतीयोग्य सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.

गुंतवणूक म्हणून कमोडिटीज आणि त्यांचे डेरिव्हेटिव्ह्ज

वैविध्यपूर्ण गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये कमोडिटीज या महत्त्वाच्या मालमत्ता वर्ग म्हणून सातत्याने अधिक महत्त्व प्राप्त करत आहेत. महागाई, बाजारातील अस्थिरता आणि व्यापक आर्थिक अनिश्चिततेपासून संरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज हे मूळ कमोडिटी बाजारपेठांमध्ये सहभाग मिळविण्याचे प्रभावी साधन ठरत आहेत. बाजार पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि नियामक देखरेख यांमधील प्रगतीमुळे या बाजारपेठा अधिक पारदर्शक, सुलभ आणि व्यापक सहभागासाठी अधिक कार्यक्षम बनल्या आहेत. वाढता संस्थात्मक सहभाग आणि रिटेल गुंतवणूकदारांमधील वाढती जागरूकता यामुळे कमोडिटी गुंतवणूक परिसंस्था अधिक मजबूत होत आहे. जागतिक वित्तीय बाजारपेठा सातत्याने विकसित होत असताना, दीर्घकालीन पोर्टफोलिओ विविधीकरण आणि संपत्ती निर्मितीमध्ये कमोडिटीजची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

“भारतीय कमोडिटी बाजारपेठांमध्ये वाढता रिटेल सहभाग आणि अधिक दृढ होत असलेला संस्थात्मक विश्वास यांचे प्रभावी एकत्रीकरण दिसून येत आहे. ही गती बाजारपेठांना अधिक सर्वसमावेशक संपत्ती निर्मितीच्या सक्षम माध्यमांमध्ये रूपांतरित करत आहे.”

— कमोडिटी अँड कॅपिटल मार्केट पार्टिसिपंट्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीपीएआय)चे पर्यायी अध्यक्ष अजय गर्ग

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande