
माद्रिद, ३१ जुलै (हिं.स.)उत्तर आफ्रिकेतील स्पेनचा स्वायत्त प्रदेश असलेल्या सेउटामधील परिस्थिती, स्थलांतरितांच्या मोठ्या ओघानंतर हळूहळू नियंत्रणात येत आहे. स्पॅनिश सरकारच्या म्हणण्यानुसार, सीमा ओलांडून आलेल्या ६०,००० स्थलांतरितांपैकी ४८,३०० हून अधिक लोक स्वेच्छेने मोरोक्कोला परतले आहेत.
स्पॅनिश गृह मंत्रालयाने कळवले आहे की, गुरुवार सकाळपासून मोठ्या संख्येने लोक जमिनीमार्गे आणि सागरी मार्गाने सेउटामध्ये दाखल झाले असून, त्यामुळे गोंधळ आणि मानवी संकट निर्माण झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी, मोरोक्कन सुरक्षा दलांनी नवीन स्थलांतरितांना सीमा ओलांडण्यापासून रोखण्याच्या प्रयत्नात सीमेवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला.
युरोपियन कमिशनच्या (ईयू) अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी या परिस्थितीला अस्वीकार्य म्हटले आहे आणि सांगितले की नियमांचे पालन केल्याशिवाय कोणालाही युरोपियन युनियनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाऊ नये.
दरम्यान, इटलीने स्पेनला शेंगेन मुक्त-संचार क्षेत्रातून निलंबित करण्याची मागणी केली. नंतर फिनलंड आणि डेन्मार्कने या मागणीला पाठिंबा दिला. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मेर्झ यांनी मोरोक्कोला बेकायदेशीर स्थलांतरितांना तात्काळ हद्दपार करण्याचे आवाहन केले.
फ्रान्स आणि ब्रिटनने या संकटाचा सामना करण्यासाठी स्पेनला मदतीचा हात पुढे केला आहे, तर फ्रान्सने स्पेनसोबतच्या आपल्या सीमेवर सुरक्षा तपासणीही कडक केली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या संकटावरून स्पॅनिश सरकारवर टीका केली. मेरीलँडमधील कॅम्प डेव्हिड येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते म्हणाले की, सेउटामधील परिस्थिती अनियंत्रित स्थलांतराचे धोके दर्शवते. ते म्हणाले, मी स्पेनमधील विध्वंस पाहिला. जणू काही लाखो लोकांनी एका देशावर हल्ला केला आहे असे वाटले. जर योग्य धोरणे अवलंबली नाहीत, तर अमेरिकेतही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानेही एक निवेदन जारी करून स्पॅनिश सरकारवर युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर स्थलांतराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आणि म्हटले की अमेरिका या मुद्द्यावर आपल्या मित्र राष्ट्रांसोबत संभाव्य कारवाईचा विचार करत आहे.
अनेक उजव्या विचारसरणीच्या युरोपीय नेत्यांनीही या संकटावर तीव्र प्रतिक्रिया दिली. जर्मनीच्या 'अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी' (AfD) पक्षाच्या सह-नेत्या अॅलिस वायडेल म्हणाल्या की, स्थलांतरितांचा मोठा ओघ संपूर्ण युरोपसमोर एक आव्हान उभे करतो. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आंद्रेज बाबिस यांनीही स्पेनच्या स्थलांतर धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मात्र, स्पॅनिश सरकारचा दावा आहे की परिस्थिती वेगाने सामान्य होत आहे आणि मोठ्या संख्येने स्थलांतरित स्वेच्छेने मोरोक्कोला परतले आहेत. सरकारने इतर देशांवर या मानवतावादी संकटाचा राजकीय फायदा घेतल्याचा आरोपही केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे