महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांची सरकारवर जोरदार टीका
मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरही निशाणा स
Raj Thackeray MNVS Anniversary Speech Slams Government Mumbai


मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरही निशाणा साधला. देशातील सध्याची परिस्थिती, तरुणांच्या अपेक्षा, जेन झी पिढीचे प्रश्न, शिक्षण व्यवस्था आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनो आणि कधीकाळी विद्यार्थी असलेल्यांनो. बघायला आला का ऐकायला. विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन असल्याचे सांगत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी सेनेतून झाल्याचे नमूद केले. काम करत, शिकत आणि घडत आपण इथपर्यंत पोहोचलो असल्याचे त्यांनी सांगितले. अमित आणि त्यांचे सहकारी चांगले काम करतील, तसेच सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी सांगितले की, आपण कामाला सुरुवात केली तेव्हा काळ वेगळा होता आणि त्यावेळचे विषयही वेगळे होते. “आम्ही टेलिग्रामपासून ते इन्स्टाग्रामपर्यंतचा काळ पाहिला आहे,” असे म्हणत त्यांनी सध्याच्या जेन झी पिढीबाबत भाष्य केले. १९९७ नंतर जन्मलेली आणि २०११-१२ पर्यंतची ही पिढी केवळ मुंबई, पुणे किंवा दिल्लीपुरती मर्यादित नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आहे, असे त्यांनी सांगितले. या तरुणांच्या अपेक्षा, स्वप्ने आणि गरजा समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, लहानपणी आई-वडील झोपताना डोक्याला तेल लावण्याचा सल्ला द्यायचे, त्यामुळे बुद्धी तल्लख होते असे सांगायचे. मात्र, “एका माणसाने आयुष्यभर डोक्याला तेल चोपडले, पण बुद्धी आली नाही,” असा टोला त्यांनी लगावला. शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून काय बोलावे आणि काय करावे याचा विचार झाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. आधारशी लिंक करण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण चुकीच्या मार्गावर भरकटल्याचे म्हटल्याचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, तरुण चुकीच्या मार्गावर नाहीत, तर त्यांच्या अपेक्षा आणि आकांक्षा दडपल्या जात आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

धर्म आणि तरुणांच्या प्रश्नांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, तरुण हवालदिल झाला की तो देवाकडे जातो. मात्र त्याला धर्मांध बनवू नका, शिक्षण आणि रोजगाराच्या मार्गावर आणा. “नुसतं जय श्रीराम म्हणून होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. गोरक्षकांच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य करत सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले.

राम मंदिर आणि सिद्धिविनायक मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी वक्तव्य केले. मंदिरात श्रद्धेने दान देणाऱ्या भाविकांच्या पैशांची चोरी होत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सिद्धिविनायक मंदिरातून दरवर्षी सुमारे १८ कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी एका पत्राच्या आधारे केला आणि यामध्ये वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्रोलिंगबाबतच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. कोणाबाबतही चुकीची आणि खालच्या पातळीची भाषा वापरली जाऊ नये, असे सांगताना त्यांनी भाजपमधील ट्रोल करणाऱ्या लोकांनाही मर्यादा पाळण्याचा सल्ला द्यावा, असे म्हटले.

नीट आंदोलनामागे केवळ परीक्षा पेपरफुटीचे कारण नसून देशातील एकूण परिस्थिती, बेरोजगारी, शिक्षणानंतर नोकऱ्यांचा अभाव, खेळाची मैदाने आणि सुविधा नसणे, तसेच तरुणांमध्ये साचलेला असंतोष कारणीभूत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. देशात निवडणुका, राजकीय घडामोडी आणि सत्तेचे राजकारण सुरू असताना तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande