'शिवभावे जीवसेवा'चे साकार रूप ठरलेले स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन रुग्णालय
- बाळासाहेब देवरसांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या सेवायात्रेला 53 वर्षे पूर्ण - आता 200 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचा संकल्प नागपूर, 01 ऑगस्ट (हिं.स.) : वाढत्या महागाईच्या काळात दर्जेदार आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना नाग
स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन हॉस्पीटल नागपूर लोगो


- बाळासाहेब देवरसांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या सेवायात्रेला 53 वर्षे पूर्ण

- आता 200 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचा संकल्प

नागपूर, 01 ऑगस्ट (हिं.स.) : वाढत्या महागाईच्या काळात दर्जेदार आरोग्यसेवा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना नागपूरच्या खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन रुग्णालय गेली 53 वर्षे सेवा, समर्पण आणि संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करत आहे. श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या 'शिवभावे जीवसेवा' या तत्त्वाचा अंगीकार करून हे रुग्णालय अल्पदरात आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत गरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरले आहे.

सन १९७४ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक पू. बाळासाहेब देवरस यांच्या प्रेरणा आणि प्रयत्नांतून विवेकानंद मेडिकल मिशनची स्थापना झाली. त्या काळी खापरी परिसर जंगलासारखा होता आणि येथे संघाचे शिक्षणवर्ग भरत असत. आज ज्या ठिकाणी रुग्णालयाची भव्य इमारत उभी आहे, तेथे पूर्वी गोशाळा होती.

बाळासाहेब देवरस यांनी परिसरातील सुमारे १५० गावांतील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने येथे रुग्णालय उभारण्याचे स्वप्न पाहिले. या कार्याची जबाबदारी ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. नानासाहेब सालपेकर यांच्याकडे सोपविण्यात आली. सुरुवातीच्या काळात आठवड्यातून एक दिवस बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) चालविला जात असे. डॉक्टरांना नमुना स्वरूपात मिळणारी औषधे गरजू रुग्णांना मोफत दिली जात होती. कालांतराने रुग्णसंख्या वाढत गेली आणि आठवड्यातून एकदा भरणारी ओपीडी दररोज सुरू झाली. सुरुवातीला नेत्रचिकित्सेपासून सुरू झालेली सेवा आज सर्व प्रमुख आजारांच्या उपचारांपर्यंत विस्तारली आहे.

आधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज सुपर स्पेशालिटी सेवा

स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता यांनी सांगितले की, गोशाळेच्या जागेवर सुरू झालेले हे रुग्णालय आज 100 खाटांचे आधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनले आहे. येथे दुर्बीण शस्त्रक्रिया, न्युरोसर्जरी, सांधे प्रत्यारोपण (जॉइंट रिप्लेसमेंट), मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, लेझरद्वारे व्हेरिकोज व्हेन्स उपचार, सीटी स्कॅन, डायलिसिस, बालहृदय शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्त्रीरोग व प्रसूती सेवा, नेत्रचिकित्सा तसेच इतर अनेक आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. राष्ट्रीय महामार्गालगत रुग्णालय असल्यामुळे अपघातग्रस्तांना प्रथम येथेच आणले जाते. त्यामुळे रुग्णालयात 100 खाटांबरोबरच 11 अतिदक्षता (आयसीयू) खाटा उपलब्ध आहेत. तसेच येथे परिचारिका (नर्सिंग) प्रशिक्षणही दिले जाते. सध्या दोन वर्षांच्या नर्सिंग अभ्यासक्रमात 40 विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत.

सरकारी योजनांद्वारे गरजू रुग्णांवर मोफत उपचार

रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना खळतकर यांनी सांगितले की, कान-नाक-घसा (ईएनटी), अस्थिरोग, नेत्ररोग, हृदयरोग, स्त्रीरोग व प्रसूती विभागासह विविध वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. वाढत्या उपचार खर्चाच्या पार्श्वभूमीवर हे रुग्णालय हजारो कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसहभाग आणि सेवाभावातून उभे राहिलेले संस्थान

डॉ. दिलीप गुप्ता यांनी सांगितले की, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनची वाटचाल समाजाच्या सहकार्याने आणि स्वयंसेवकांच्या समर्पणातून घडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी केलेल्या निधी संकलनासह समाजातील अनेक व्यक्ती व संस्थांच्या सहकार्यामुळे रुग्णालयाचा सातत्याने विकास झाला. रुग्णालयाच्या सेवाभावी कार्याने प्रभावित होऊन परदेशी संस्थांनीही मदतीचा हात पुढे केला. जपान सरकारने अत्याधुनिक न्युरोसर्जरी उपकरणे उपलब्ध करून दिली, तर ब्रह्मोसकडून बालरुग्णांसाठी आधुनिक व्हेंटिलेटर देण्यात आला. आज रुग्णालयात जवळपास सर्व सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत.

तब्बल 200 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय प्रस्तावित

भविष्यातील योजनांविषयी माहिती देताना डॉ. गुप्ता म्हणाले की, विद्यमान इमारतीलगतच्या जागेवर २०० खाटांचे नवीन अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याची योजना सुरू आहे. प्रस्तावित ११ मजली इमारतीत 60 आयसीयू खाटा, नऊ आधुनिक ऑपरेशन थिएटर आणि रोबोटिक शस्त्रक्रिया विभाग उभारण्यात येणार आहे. त्यामुळे विदर्भासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उच्च दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील. ते पुढे म्हणाले की, पू. बाळासाहेब देवरस यांनी गरीब आणि गरजू नागरिकांना माफक दरात दर्जेदार उपचार मिळावेत या ध्येयाने या संस्थेची पायाभरणी केली. आजही स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन 'शिवभावे जीवसेवा' या तत्त्वाला अनुसरून प्रत्येक रुग्णात शिवाचे दर्शन मानत निरपेक्ष सेवाकार्य अखंडपणे पुढे नेत आहे. हाच सेवाभाव, समर्पण आणि मानवी संवेदनांचा वारसा या संस्थेची खरी ओळख ठरला आहे.

----------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande