सीजेपीची दहशत : टाटा इन्स्टिट्यूटने दीक्षांत पुढे ढकलला
सरन्यायमूर्ती सूर्यकांत होते प्रमुख पाहुणे मुंबई, 01ऑगस्ट (हिं.स.) : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी रविवारी 2 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला 86 वा दीक्षांत समारंभ ऐनवेळी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या समारंभाला भारताचे सरन्
टाटा इन्स्टिट्यूट लोगो


सरन्यायमूर्ती सूर्यकांत होते प्रमुख पाहुणे

मुंबई, 01ऑगस्ट (हिं.स.) : मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसनी रविवारी 2 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेला 86 वा दीक्षांत समारंभ ऐनवेळी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या समारंभाला भारताचे सरन्यायमूर्ती सूर्यकांत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते.संस्थेच्या निबंधकांनी गुरुवारी मध्यरात्रीनंतर विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे समारंभ पुढे ढकलल्याची माहिती दिली. ई-मेलमध्ये अनपेक्षित परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संस्थेतील अधिकारी आणि विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार, कॅम्पसमधील सुरक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. गुप्तचर यंत्रणांकडून काही विद्यार्थ्यांकडून पाहुण्यांविरोधात आंदोलन किंवा निदर्शने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. विशेषतः 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) शी संबंधित काही घटक कार्यक्रमात विरोध करू शकतात, अशी भीती प्रशासनाला होती.या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते.

समारंभ पुढे ढकलण्याबाबत टीस्स प्रशासनाने स्पष्ट केले की, सध्याच्या परिस्थितीत कार्यक्रम योग्य आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडणे शक्य नव्हते. कार्यक्रम आयोजित केल्यास विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच मान्यवर पाहुण्यांच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने हा कठीण निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय झाली आहे. अनेकांनी प्रवासासाठी विमान, रेल्वे तसेच हॉटेलचे आरक्षण आधीच केले होते.या पार्श्वभूमीवर टीस्स प्रशासनाने विद्यार्थ्यांची व पालकांची अडचण लक्षात घेत असल्याचे सांगितले आहे. शेवटच्या क्षणी कार्यक्रम रद्द झाल्यामुळे आर्थिक नुकसान झालेल्यांच्या अर्जांचा स्वतंत्रपणे विचार करण्यात येईल, असेही संस्थेने स्पष्ट केले. तसेच दीक्षांत समारंभाची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. ज्यांना तातडीने पदवीची आवश्यकता आहे, त्यांना तात्पुरते (प्रोव्हिजनल) प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे संस्थेने सांगितले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande