फ्रेंडशिप डे विशेष : कलाकारांनी सांगितल्या सेटवर जुळलेल्या खास मैत्रीच्या आठवणी
मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.)। दैनंदिन मालिकांच्या चित्रीकरणात कलाकार दिवसातील अनेक तास एकत्र घालवतात. सततच्या शूटिंगमध्ये, एकत्र सीनची तयारी करताना, गप्पा मारताना, एकत्र जेवताना आणि एकमेकांना आधार देताना नकळत काही खास नाती तयार होतात. ही नाती फक्त सहकल
फ्रेंडशिप डे विशेष :  कलाकारांनी सांगितल्या सेटवर जुळलेल्या खास मैत्रीच्या आठवणी


मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.)। दैनंदिन मालिकांच्या चित्रीकरणात कलाकार दिवसातील अनेक तास एकत्र घालवतात. सततच्या शूटिंगमध्ये, एकत्र सीनची तयारी करताना, गप्पा मारताना, एकत्र जेवताना आणि एकमेकांना आधार देताना नकळत काही खास नाती तयार होतात. ही नाती फक्त सहकलाकारांची राहत नाहीत, तर आयुष्यभर जपावी अशी सुंदर मैत्री बनतात. सेटवरील हशा, आठवणी, सुख-दुःखाचे क्षण आणि एकमेकांना दिलेला आधार या सगळ्यांमुळे त्यांचं नातं अधिक घट्ट होत जातं. फ्रेंडशिप दिनानिमित्त झी मराठीवरील तुमच्या लाडक्या कलाकारांनी सेटवर जुळलेल्या त्यांच्या खास मैत्रीबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या. कोण आहे त्यांचा सर्वात जवळचा मित्र किंवा मैत्रीण, त्यांची मैत्री कशी फुलली आणि शूटिंगदरम्यानचे कोणते क्षण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतात, याबद्दल त्यांनी आठवणी शेअर केल्या.

'कमळी'ची भूमिका साकारणारी विजया बाबर हिने मालिकेच्या सेटवर जुळलेल्या मैत्रीबद्दल म्हणाली की, सेटवरील सर्व कलाकारांशी तिची छान मैत्री झाली आहे. मात्र साक्षी (निंगी) आणि निखिल (ऋषी ) यांच्याशी तिचं खास नातं जुळलं आहे. हे दोघे शूटिंगला नसले की सेटवर काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं. मालिकेच्या सुरुवातीपासूनच साक्षी तिच्यासोबत आहे. काम करताना त्यांच्या मैत्रीचं नातं अधिक घट्ट झालं. एकमेकींच्या सुख-दुःखात त्या कायम सोबत असतात. साक्षीला जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते किंवा ती गोंधळते, तेव्हा तिला धीर देणं आणि तिचा आत्मविश्वास वाढवणं विजया आवर्जून करते. निखिलबद्दल बोलताना ती म्हणाली की, त्याच्या विनोदांमुळे सेटवरील वातावरण नेहमीच आनंदी राहतं. त्याच्यासोबत बिर्याणी आणि डायट कोकचा आस्वाद घेत गप्पा मारण्याचे क्षणही तिला खूप आवडतात. या सगळ्या मैत्रीमुळे शूटिंगचा सेट तिच्यासाठी दुसऱ्या घरासारखा झाला आहे.

'शुभ श्रावणी' मालिकेत श्रावणीची भूमिका साकारणारी वल्लरी विराज हिने सेटवर जुळलेल्या खास मैत्रीबद्दल सांगितले. ती म्हणाली की, मालिकेत स्वीटीची भूमिका साकारणारी भूमिजा पाटील ही तिची सर्वात जवळची मैत्रीण आहे. याआधीही दोघींनी एकत्र काम केले असल्याने त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली आहे. मोठे सीन किंवा लांबलचक संवाद असले की त्या एकमेकींना संवादांची तयारी करून देतात आणि प्रत्येक प्रसंगात एकमेकींना मदत करतात. शूटिंगदरम्यान संध्याकाळी ५ वाजता ब्लॅक कॉफी आणि डार्क चॉकलेटचा आस्वाद घेणे हा त्यांचा आवडता वेळ असतो. दोघींना एकाच प्रकारची गाणी आवडतात. मेकअप करताना गाणी ऐकणे, गप्पा मारणे आणि कधीमधी एकत्र नाचणेही त्यांना खूप आवडते. इतकेच नाही, तर अनेकदा त्या एकत्र सेटवर येतात आणि एकत्रच घरीही जातात. त्यामुळे भूमिजा शूटिंगला नसली की तिची खूप आठवण येते, असे वल्लरीने सांगितले.

सावळ्याची जणू सावली मध्ये सावली साकारणारी प्राप्ती रेडकर म्हणाली, आमच्या सेटवर माझ्या खास मैत्रिणी म्हणजे भाग्यश्री दळवी आणि मेघा धाडे. आम्ही तिघी बेस्ट फ्रेंड्स आहोत. सध्या आमचं शूटिंग एकत्र नसल्यामुळे मी त्यांना खूप मिस करते.सीनच्या मध्ये वेळ मिळाला की आम्ही डांस करतो, गेम्स खेळतो, रील्स बनवतो, खूप गप्पा मारतो, कधी झोप काढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही एकत्र आवडीचे पदार्थ खातो. भाग्यश्री आणि मेघा ताई माझे खूप लाड करतात. आम्ही अनेकदा एकत्र डिनर डेटलाही जातो.त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. मालिकेत भैरवी, सावली आणि तारा यांचं एकमेकांशी जमत नसलं, तरी खऱ्या आयुष्यात मेघा, भाग्यश्री आणि माझी मैत्री खूप सुंदर आहे.फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने मला त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि माझ्या आयुष्यात इतक्या छान मैत्रिणी असल्याबद्दल त्यांचे आभार मानायचे आहेत.

पडद्यावर वेगवेगळ्या नात्यांना जिवंत करणारे हे कलाकार, पडद्यामागेही तितकीच सुंदर आणि जिव्हाळ्याची मैत्री जपताना दिसतात. या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने त्यांच्या या मनमोकळ्या आठवणी प्रत्येकालाच आपल्या मित्रांची आठवण करून देणाऱ्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande