नवनीत राणांच्या सूचक व्हॉट्सऍप्प स्टेटसने अमरावतीच्या राजकारणात चर्चांना उधाण
अमरावती, १० ऑगस्ट (हिं.स.) : अमरावतीच्या राजकारणात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार नवनीत राणा यांच्या नव्या व्हॉट्सऍप स्टेटसने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘पुराने पेड़ों का मजाक उड़ा रहे हैं नये पौधे... इन्होंन
'पुराने पेडो का मजाक उडा रहेथे नये पौधे...':नवनीत राणांचे स्टेटस चर्चेत, रवी राणा आणि भाजपमधील वादानंतर नेमका रोख कोणावर?


अमरावती, १० ऑगस्ट (हिं.स.) : अमरावतीच्या राजकारणात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकींच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार नवनीत राणा यांच्या नव्या व्हॉट्सऍप स्टेटसने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘पुराने पेड़ों का मजाक उड़ा रहे हैं नये पौधे... इन्होंने अभी तूफानों के झटके नहीं देखे...’ असे सूचक स्टेटस त्यांनी ठेवले आहे. विशेष म्हणजे, गेल्या २४ तासांत त्यांनी ठेवलेले हे दुसरे लक्षवेधी स्टेटस असल्याने त्यातून नेमका कोणाला इशारा देण्यात आला आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

नवनीत राणा यांचा हा टोला पक्षातील स्वकीयांना आहे की अन्य राजकीय विरोधकांना, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आमदार रवी राणा आणि भाजपच्या काही आमदारांमध्ये नुकत्याच झालेल्या शाब्दिक वादाच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्याकडून सोशल मीडियावर सातत्याने सूचक पोस्ट केल्या जात असल्याने त्यांच्या नव्या स्टेटसची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा होत आहे.

‘दुनिया कहती है खेल बदलना मुश्किल है...’

यापूर्वी नवनीत राणा यांनी आमदार रवी राणा यांच्या छायाचित्रासोबत ‘दुनिया कहती है खेल बदलना मुश्किल है, लेकिन मैं खेल नहीं, खेलने वाले बदल देता हूं...’ असे कॅप्शन असलेले स्टेटस ठेवले होते. या स्टेटसमधून त्यांनी नेमका कोणाला संदेश दिला, याची चर्चा सुरू असतानाच आता त्यांनी पुन्हा एक सूचक स्टेटस ठेवल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.

नेमका रोख कोणाकडे?

नवनीत राणा यांच्या नव्या व्हॉट्सऍप स्टेटसमध्ये कोणत्याही नेत्याचे किंवा राजकीय पक्षाचे नाव थेट घेण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचा रोख भाजपमधील स्वकीयांकडे आहे की राजकीय विरोधकांकडे, याबाबत विविध तर्क मांडले जात आहेत.

आमदार रवी राणा यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपच्या तीन आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले होते.

या ताज्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांचे नवे स्टेटस समोर आल्याने त्याचा संबंध या वादाशी जोडला जात आहे.

दरम्यान, नवनीत राणा यांनी आपल्या स्टेटसमधून कोणाचेही नाव घेतले नसल्याने त्यांचा नेमका राजकीय संदेश कोणासाठी आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे त्यांच्या या सूचक वक्तव्यावर अमरावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande