छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्टपासून ‘स्वदेशी’ फॅशन व लाइफस्टाइल एक्स्पो
छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) सहकार्याने ‘शिखा’ज कारागीरी’ संस्थेच्या समन्वयातून ‘स्वदेशी – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ या भव्य हस्तकला मेळाव्याचे आयोजन छत्रपती संभ
छत्रपती संभाजीनगरात १४ ऑगस्टपासून ‘स्वदेशी’ फॅशन व लाइफस्टाइल एक्स्पो


छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमई) सहकार्याने ‘शिखा’ज कारागीरी’ संस्थेच्या समन्वयातून ‘स्वदेशी – फॅशन अँड लाइफस्टाइल एक्स्पो २०२६’ या भव्य हस्तकला मेळाव्याचे आयोजन छत्रपती संभाजीनगरात करण्यात आले आहे. १४ ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान सागर रिसॉर्ट्स येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात देशभरातील स्वदेशी उत्पादने, हस्तकला, हातमाग, फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांचे वैविध्य नागरिकांना अनुभवता येणार आहे. १०० हून अधिक पुरस्कारप्राप्त कारागीर, एमएसएमई उद्योग, स्टार्टअप्स, महिला उद्योजिका, हातमाग व हस्तकला उत्पादक, ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ (ODOP) उपक्रमातील उद्योजक, सहकारी संस्था तसेच विविध लाइफस्टाइल ब्रँड या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

या उपक्रमाला ट्रायफेड (TRIFED), खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC), नॅशनल ज्यूट बोर्ड यांच्यासह केंद्र व राज्य शासनाशी संबंधित विविध संस्थांचे सहकार्य लाभणार आहे.

परंपरागत कौशल्य आणि आधुनिक उद्योजकतेचा संगम

भारताच्या विविध प्रांतांतील पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक उद्योजकतेचा अनोखा संगम या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. विविध राज्यांतील हस्तकला, हातमाग, फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांची विविधता एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने चोखंदळ ग्राहकांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षण ठरणार आहे.

कारागिरी म्हणजे केवळ एखादी वस्तू तयार करण्याचे कौशल्य नसून पिढ्यान्पिढ्या जपलेली कला, परंपरा, कल्पकता आणि स्थानिक ज्ञानाचा अमूल्य वारसा आहे. देशातील विविध राज्यांतील कुशल कारागिरांनी तयार केलेल्या हस्तकला व हातमाग उत्पादनांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, एमएसएमई आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे तसेच भारतीय स्वदेशी उत्पादनांची व्याप्ती वाढविणे, हा या प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश आहे.

‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ला चालना

‘आत्मनिर्भर भारत’, ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे हे प्रदर्शन ठरणार आहे. विविध भागांतील प्रतिभावान कारागिरांना आपली उत्पादने आणि कौशल्य मोठ्या ग्राहकवर्गासमोर मांडण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक भूमीवर साकारत असलेला हा स्वदेशीचा भव्य उत्सव कारागिरी, उद्योजकता आणि भारतीय परंपरेचे दर्शन घडविणारा ठरणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील कलाकुसर, नावीन्यपूर्ण उत्पादने आणि उद्योजकतेची नवी ऊर्जा एकाच छताखाली अनुभवता येणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने सागर रिसॉर्ट्स येथे भेट देऊन या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande