नांदगाव शिक्षण विभागात राजकीय हस्तक्षेपाचा आरोप
गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधात शिक्षकांमध्ये संताप नांदगाव, 10 ऑगस्ट (हिं.स.) : नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे हे आपल्या पदाचा गैरव
Abuse of office by group


गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधात शिक्षकांमध्ये संताप

नांदगाव, 10 ऑगस्ट (हिं.स.) : नांदगाव तालुक्यातील शिक्षण विभागात सध्या राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे चिंतेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे हे आपल्या पदाचा गैरवापर करून विद्यमान आमदार सुहास कांदे आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासाठी राजकीय प्रचाराचे काम करत असल्याचा गंभीर आरोप शिक्षकांकडून करण्यात आला आहे. या कथित राजकीय हस्तक्षेपामुळे तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गटशिक्षणाधिकारी नाईकवाडे यांच्याकडून शिक्षकांवर राजकीय प्रचाराच्या कामात सहभागी होण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. या कामास नकार देणाऱ्या किंवा शासकीय नियमांचे पालन करण्याची भूमिका घेणाऱ्या शिक्षकांना बदली अथवा निलंबनाच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे.

शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी होणे किंवा आपल्या पदाचा वापर करून शिक्षकांवर राजकीय दबाव आणणे हे नियमबाह्य असल्याचा दावा शिक्षकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना दप्तर व वह्यांसह शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम सुरू आहे. मात्र, या साहित्यावर आमदार सुहास कांदे यांचे छायाचित्र तसेच त्यांच्या राजकीय पक्षाचे चिन्ह छापण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शासकीय व निमशासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर राजकीय प्रसिद्धीसाठी होत असल्यास तो गंभीर विषय असल्याची प्रतिक्रिया शिक्षक व पालकांकडून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचा राजकीय प्रचारासाठी वापर केला जाऊ नये, अशी मागणीही करण्यात येत आहे.

या संदर्भातील कार्यक्रमांचे फोटो आणि वेळापत्रक सोशल मीडियावर आमदार व त्यांच्या समर्थकांकडून प्रसारित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सत्यता तपासण्यासाठी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या आरोपांबाबत गटशिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे तसेच आमदार सुहास कांदे यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande