
अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.)
धामोरी येथील राहुल रावेरकर हत्याकांडातील आरोपी साहिल भगत आणि पियुष गायकवाड यांची पोलिसांनी मृतक राहुल रावेरकर यांच्या वाठोडा शुक्लेश्वर गावातून धिंड काढली. आरोपींना गावातून नेत असताना मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. यावेळी संतप्त नागरिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला.आरोपींची धिंड सुरू असताना काही ग्रामस्थांनी आक्रमक होत आरोपींच्या अंगावर चालून जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आरोपींना सुरक्षितपणे पोलिस वाहनात बसविले. मात्र, संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या वाहनाला घेराव घातला.यावेळी “मारेकऱ्यांना आमच्या ताब्यात द्या” अशी मागणी करत नागरिकांनी पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचे समोर आले. राहुल रावेरकर यांच्या हत्येने गावात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा, तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला. आरोपींना न्यायालयासमोर हजर करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी