उदगीरमध्ये शेतात गांजाची लागवड करणारा आरोपी ताब्यात
लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। : अमली पदार्थांची अवैध विक्री व सेवनाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत उदगीर ग्रामीण पोलिसांनी करडखेल येथे शेतात गांजाची लागवड करणाऱ्या आरोपीवर कारवाई केली. या कारवाईत १३७ गांजाची ह
पोलीस कारवाई


लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

: अमली पदार्थांची अवैध विक्री व सेवनाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाकडून सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत उदगीर ग्रामीण पोलिसांनी करडखेल येथे शेतात गांजाची लागवड करणाऱ्या आरोपीवर कारवाई केली. या कारवाईत १३७ गांजाची हिरवी रोपे आणि ३७० ग्रॅम सुका गांजा असा एकूण १ किलो १९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, एकूण ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

करडखेल येथील आरोपीच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. अंगद हरीबा भंडारे (वय ४८, रा. करडखेल, ता. उदगीर) याच्या शेताची तपासणी केली असता हिरवट रंगाची व उग्र वास येणारी गांजाची १३७ रोपे आढळून आली. या रोपांचे वजन ८२० ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत ४१ हजार रुपये आहे.

याच ठिकाणी पाने व बोंड असलेला हिरवट रंगाचा ३७० ग्रॅम सुका गांजा आढळून आला. त्याची अंदाजे किंमत १८ हजार ५०० रुपये आहे. अशा प्रकारे एकूण १ किलो १९० ग्रॅम गांजा व गांजाची रोपे असा ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

प्राथमिक तपासात आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची लागवड करून अवैध विक्रीच्या उद्देशाने तो बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५९/२०२६, कलम ८(क), २०(अ)(१), २०(ब) एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

कारवाईनंतर घटनास्थळी उदगीर येथील न्यायवैज्ञानिक पथक दाखल झाले. जप्त अमली पदार्थांचे नमुने तसेच इतर आवश्यक पुरावे नियमानुसार संकलित करून पुढील तपासासाठी सुरक्षित करण्यात आले आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे, पोलीस निरीक्षक दिलीप गाडे आणि पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन कारवाईची पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंबडे, उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.

अमली पदार्थांची विक्री व सेवन रोखण्यासाठी केवळ विक्रेत्यांवर कारवाई न करता अमली पदार्थांची लागवड, साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीवर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande