
अकोला, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
लोकसभेत आगामी आठवड्यात दोन महत्त्वाची विधेयकं सादर होणार आहेत. या विधेयकांच्या समर्थनार्थ कोण उभं राहतं आणि कोण सभागृहातून बाहेर पडतं, यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीचं खरं कारण स्पष्ट होईल, असं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि पंतप्रधान यांच्यात झालेल्या बैठकीवरून सध्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या बैठकीमागचं नेमकं कारण आगामी आठवड्यात स्पष्ट होईल, असा दावा मिटकरी यांनी केला आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरही मिटकरी यांनी भाष्य केलं. भाजपवर आपला विश्वास असून अर्थमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल, अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आपली ताकद वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचंही मिटकरी म्हणाले.'आमची ताकद कुठे कमी दिसत असेल, तर रोहित पवारांनी ते दाखवून द्यावं, आम्ही ती ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू,' असं प्रत्युत्तरही मिटकरी यांनी दिलं.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदासंदर्भात पक्षाचे नेते भाऊसाहेब गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवरही मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. लोकशाही पद्धतीने कोणी तक्रार करत असेल, तर त्याचा कोणीही वाईट वाटून घेऊ नये, असं त्यांनी स्पष्ट केलं.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे