रायगडमध्ये नवउद्योजक महिलांसाठी ‘अमृत’चे कौशल्यवर्धन प्रशिक्षण सुरू
रायगड, 10 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीअष्टविनायक क्षेत्र श्रीबल्लाळेश्वर देवस्थान, सुधागड-पाली येथे ‘अमृत उद्योग कौशल्यवर्धन’ (EDP) या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा ७ ऑगस्ट रोज
नवउद्योजक महिलांसाठी ‘अमृत’चे कौशल्यवर्धन प्रशिक्षण सुरू


रायगड, 10 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीअष्टविनायक क्षेत्र श्रीबल्लाळेश्वर देवस्थान, सुधागड-पाली येथे ‘अमृत उद्योग कौशल्यवर्धन’ (EDP) या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा ७ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. जिल्ह्यातील नवउद्योजक महिलांना उद्योग क्षेत्रात सक्षम करण्याच्या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

दहा दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये पहिल्या चार दिवसांत प्रत्यक्ष ऑफलाईन प्रशिक्षण, तर पुढील सहा दिवस ऑनलाइन व्हिडिओ सत्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नवीन उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, अस्तित्वातील व्यवसायाचा विस्तार, आर्थिक नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग तसेच विविध शासकीय योजनांची माहिती तज्ज्ञांकडून देण्यात येणार आहे.

उद्घाटनप्रसंगी पाली येथील यशस्वी उद्योजक मिलिंद भावे यांनी स्वतःच्या व्यावसायिक प्रवासाबाबत प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला. व्यवसायाची सुरुवात करताना केलेले आर्थिक नियोजन, सुरुवातीचे भांडवल उभारणे, कामगारांचे नियोजन, व्यवसायातील महत्त्वाचे टप्पे तसेच आलेल्या अडचणींवर केलेली मात याबाबत त्यांनी अनुभव कथन केले. नवउद्योजक महिलांनी जिद्द, सातत्य आणि शिकण्याची तयारी कायम ठेवावी, असा संदेशही त्यांनी दिला.

चौल येथील नवउद्योजक महिला प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रशिक्षणामुळे महिलांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक कौशल्ये, आर्थिक नियोजन आणि बाजारपेठेचे ज्ञान मिळून स्वावलंबनाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande