अतिवृष्टीग्रस्त विहिरींच्या दुरुस्तीसाठी ८४.३० लाखांचा निधी वितरित
सोलापूर जिल्ह्यातील ५९४ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता ३२ लाभार्थ्यांची उपयोगिता प्रमाणपत्रे प्रलंबित सोलापूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : ऑक्टोबर २०२५मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ५९४ प
अतिवृष्टीग्रस्त विहिरींच्या दुरुस्तीसाठी ८४.३० लाखांचा निधी वितरित


सोलापूर जिल्ह्यातील ५९४ लाभार्थ्यांना दुसरा हप्ता

३२ लाभार्थ्यांची उपयोगिता प्रमाणपत्रे प्रलंबित

सोलापूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : ऑक्टोबर २०२५मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ५९४ पात्र लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी ८४ लाख ३० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित ३२ लाभार्थ्यांची उपयोगिता प्रमाणपत्रे अद्याप प्रलंबित आहेत.

अतिवृष्टी आणि महापुरामुळे बुजलेल्या तसेच खचलेल्या विहिरींचे प्रशासनाकडून पंचनामे करण्यात आले होते. या पंचनाम्यांच्या आधारे जिल्ह्यातील ६२६ विहिरींच्या दुरुस्तीसाठी एकूण १ कोटी ८७ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्रत्येक पात्र लाभार्थ्याला विहीर दुरुस्तीसाठी एकूण ३० हजार रुपयांची मदत दोन टप्प्यांत देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. त्यानंतर विहिरीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करून उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणाऱ्या लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ६२६ लाभार्थ्यांपैकी ५९४ लाभार्थ्यांनी उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केली आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर दुसऱ्या हप्त्यापोटी ८४ लाख ३० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

दरम्यान, उर्वरित ३२ लाभार्थ्यांनी अद्याप उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत. संबंधित लाभार्थ्यांनी प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर त्यांच्या पात्रतेनुसार पुढील निधी वितरणाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande