
महिला बचत गटांच्या पाककौशल्याला व्यवसायाची जोड स्वयंरोजगार व आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन
जळगाव, १० ऑगस्ट (हिं.स.) : महिला बचत गटातील सदस्यांच्या उद्योजकतेला आणि आर्थिक स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी दि. जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या महाबळ कॉलनी शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भजे महोत्सवा’ला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महिला बचत गटांच्या सदस्यांच्या पाककौशल्याला व्यवसायाची जोड देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात विविध बचत गटांतील महिलांनी पारंपरिक तसेच विविध प्रकारच्या भज्यांचे स्टॉल उभारले होते. नागरिकांनी या स्टॉल्सना भेट देत विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.
महोत्सवाचे उद्घाटन सौ. संगीताताई बरडे, डॉ. एकताताई चौधरी, बँकेच्या संचालिका सौ. ज्योत्स्नाताई बऱ्हाटे आणि मुख्य व्यवस्थापक शुभश्रीजी दप्तरी यांच्या हस्ते करण्यात आले.
महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
महिला बचत गटांना केवळ आर्थिक मदत न करता त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी निर्माण करणे आणि स्वयंरोजगाराला चालना देणे, हा या महोत्सवामागील प्रमुख उद्देश होता.
सहभागी महिलांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या भज्यांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी महिला बचत गटांच्या उपक्रमांचे कौतुक केल्याने सहभागी महिलांचा उत्साहही वाढला.
व्यवसायवाढीसाठी ठरला उपयुक्त उपक्रम
बँकेने प्रथमच आयोजित केलेला हा ‘भजे महोत्सव’ महिला बचत गटांच्या सदस्यांसाठी आपल्या उत्पादनांची ओळख निर्माण करण्याबरोबरच व्यवसायवाढीसाठीही उपयुक्त ठरला. या माध्यमातून महिलांना नव्या व्यावसायिक संधी उपलब्ध होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बचत गट संयोगिनी अंजली बोरसे यांनी केले.------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर