
मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत सोहळा
शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार
छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : जालना येथे भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ दिल्याबद्दल जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने सोमवारी आराध्या लॉन्स, राजूर, ता. भोकरदन येथे बदनापूर विधानसभा मतदारसंघातील भोकरदन तालुक्यातील ६५ गावांची बैठक घेण्यात आली.
बैठकीत आगामी भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि उपस्थिती याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चर्चा केली.
यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis