विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कार व स्वसंरक्षणाचे धडे द्या : दादाजी भुसे
नाशिक, १० ऑगस्ट (हिं.स.) : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संस्कार, देशभक्ती, स्वसंरक्षणाची भावना आणि सामाजिक बांधिलकी रुजविणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळास्तरावर स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यास
Along with quality education,


नाशिक, १० ऑगस्ट (हिं.स.) : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संस्कार, देशभक्ती, स्वसंरक्षणाची भावना आणि सामाजिक बांधिलकी रुजविणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळास्तरावर स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासोबतच शाळांमध्ये स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह, सुसज्ज इमारत आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

जिल्ह्यातील शिक्षण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहायता मंत्री नरहरी झिरवाळ हे दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले. यावेळी आमदार सरोज अहिरे, हिरामण खोसकर, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, नितिन पवार, मालेगावच्या महापौर नसरीन शेख, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्यावर भर देण्याच्या सूचना भुसे यांनी दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी देशभक्तीपर गीते, कवायती तसेच विविध सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करावे. प्रत्येक केंद्रात आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. शिक्षणाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, असेही त्यांनी सांगितले.

‘निपुण महाराष्ट्र अभियान’ प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी. विद्यार्थ्यांना राजीव गांधी अपघात विमा योजना, सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना यांसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. विद्यार्थ्यांना दर्जेदार गणवेश पुरविण्यात यावेत आणि निकृष्ट दर्जाचे गणवेश वितरित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत १५ ऑगस्ट रोजी प्रत्येक विद्यार्थ्याने वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करावे. तसेच ‘नशामुक्त भारत अभियान’ प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. शाळा परिसरात शालेय साहित्याव्यतिरिक्त इतर वस्तूंची विक्री होणार नाही, याचीही प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत शाळांमधील शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी उपस्थिती, गुणवत्तावाढीच्या उपाययोजना, पायाभूत सुविधा आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला. केंद्रप्रमुखांच्या पदोन्नतीचा विषय मार्गी लावण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि आवश्यक सुविधा मिळणे ही प्रशासनाची प्राथमिकता असून, सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे भुसे यांनी स्पष्ट केले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande