
सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा, चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, विडी कामगारांना कायदेशीर किमान वेतन व रोख मजुरी द्यावी, वाढती महागाई व बेरोजगारी रोखावी, पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमती कमी कराव्यात, तसेच आरोग्य व शिक्षणावरील वाढता खर्च कमी करावा, या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)च्या वतीने सोलापुरात जोरदार ‘जेल भरो’ आंदोलन करण्यात आले.
हजारो कामगारांनी हातात लाल झेंडे घेत रस्त्यावर उतरत शांती चौक परिसर दणाणून सोडला. विविध मागण्यांच्या घोषणा देत कामगारांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शने केली.
यावेळी सिटूचे राज्य उपाध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी सरकारवर जोरदार टीका केली.
“जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर जनतेचा आक्रोश आणखी तीव्रतेने रस्त्यावर दिसेल. हे जनतेचे सरकार नसून अदानी-अंबानींचे सरकार आहे,” असा आरोप आडम यांनी केला.
कामगारांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. स्मार्ट मीटरचा निर्णय, श्रमसंहितांमधील तरतुदी, वाढती महागाई आणि बेरोजगारी यांसह पेट्रोलियम पदार्थ व घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात यावेळी संताप व्यक्त करण्यात आला.
विडी कामगारांना कायदेशीर किमान वेतन मिळावे आणि मजुरी रोख स्वरूपात द्यावी, कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच सर्वसामान्यांना परवडणारे आरोग्य आणि शिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या.
शांती चौक परिसरात मोठ्या संख्येने कामगार एकत्र आल्याने काही काळ वातावरण आंदोलनमय झाले होते. विविध मागण्यांसाठी कामगारांचा हा लढा यापुढेही तीव्र करण्याचा इशारा सिटूच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड