
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्यात विविध ठिकाणी शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. या वसतिगृहांमध्ये शालेय, इयत्ता ११ वी व १२ वी तसेच बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज ७ ऑगस्ट २०२६ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत समाज कल्याण विभागाच्या ऑनलाइन पोर्टलवर https://hmasnew.mahait.org/ स्वीकारण्यात येणार आहेत.
संबंधित वसतिगृहातील प्रवेशाच्या जागा शिल्लक राहिल्यास, मुदत संपल्यानंतरही केवळ त्या वसतिगृहासाठी अर्ज स्वीकारण्यात येतील. तसेच दर आठवड्याला पुढील निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या व शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावा. तसेच अर्जाची प्रत संबंधित वसतिगृहाच्या गृहपालांकडे जमा करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, आर. एच. एडके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis