चंद्रपूर : अंगणवाडीतील पूरक पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाचे स्पष्टीकरण
प्रयोगशाळेच्या फेरतपासणीत काही नमुने निर्धारित निकषांनुसार अनुरूप नसल्याचे निरीक्षण आहार वितरणापूर्वी गुणवत्ता तपासणीच्या सूचना चंद्रपूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : महिला व बाल विकास विभागाच्या निर्धारित पाककृतीनुसार अंगणवाडी केंद्रांमधील ३ ते ६ वर्षे
चंद्रपूर : अंगणवाडीतील पूरक पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाचे स्पष्टीकरण


प्रयोगशाळेच्या फेरतपासणीत काही नमुने निर्धारित निकषांनुसार अनुरूप नसल्याचे निरीक्षण

आहार वितरणापूर्वी गुणवत्ता तपासणीच्या सूचना

चंद्रपूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : महिला व बाल विकास विभागाच्या निर्धारित पाककृतीनुसार अंगणवाडी केंद्रांमधील ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा महाराष्ट्र राज्य मान्यता प्राप्त संस्थेमार्फत करण्यात येतो. अंगणवाडी केंद्रात आहार प्राप्त झाल्यानंतर मान्यता प्राप्त प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी कोणतीही तफावत आढळली नसल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग) भागवत तांबे यांनी स्पष्ट केले.

वितरित करण्यात आलेल्या पूरक पोषण आहाराचे नमुने फेरतपासणीसाठी प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नागपूर येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी गोंडपिपरी आणि पोंभुर्णा यांच्या माध्यमातून १८ डिसेंबर २०२५ रोजी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या ३० मार्च २०२६ रोजीच्या तपासणी अहवालानुसार काही नमुने निर्धारित निकषांनुसार अनुरूप नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

प्रयोगशाळेकडून नमुना स्वीकारण्यात आलेला दिनांक आणि प्रत्यक्ष तपासणीचा दिनांक यामध्ये सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लोटला असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. तसेच पोषण आहारासाठी वापरण्यात येणारा गहू व तांदूळ भारतीय अन्न महामंडळाकडून उपलब्ध करून दिला जातो.

आहारातील जिवंत किड्यांबाबत तक्रार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच महिला व बालविकास कार्यालयाने गोंडपिपरी आणि पोंभुर्णा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांकडून आहाराच्या वितरणाबाबतची माहिती व अहवाल मागवून घेतला. प्राप्त अहवालांची तपासणी केली असता, डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६मध्ये पूरक पोषण आहारामध्ये जिवंत किडे असल्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नव्हती, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रयोगशाळेचे अहवाल ३० मार्च आणि २२ एप्रिल २०२६ रोजी प्राप्त झाल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

आहाराची गुणवत्ता तपासूनच वितरणाच्या सूचना

बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, पर्यवेक्षक तसेच अंगणवाडी सेविकांना आवश्यक त्या नियमित सूचना देण्यात आल्या आहेत.

आहाराचा साठा, प्राप्तीच्या वेळी त्याची गुणवत्ता, पॅकिंग, मुदत, रंग, वास, चव तसेच इतर दृश्यमान बाबींची तपासणी करूनच आहाराचे वितरण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संशयास्पद किंवा गुणवत्तेबाबत शंका असलेला आहार बालकांना वितरित करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बालकांना सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण पूरक पोषण आहार उपलब्ध करून देणे ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार किंवा शंका आढळल्यास ती तात्काळ संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयास कळवावी, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास विभाग, जि.प.) भागवत तांबे यांनी केले आहे.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande