लातूर : प्रभारी अधिकाऱ्यांच्या अनियमित उपस्थितीने बालविकास कार्यालयाचा कारभार प्रभावित
लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। पंचायत समिती शिरूर अनंतपाळ येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्याच्या खांद्यावर असून, संबंधित अधिकारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत
बाल विकास प्रकल्प अधिकारी


लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। पंचायत समिती शिरूर अनंतपाळ येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या प्रभारी अधिकाऱ्याच्या खांद्यावर असून, संबंधित अधिकारी नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे. कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण नेमके कोण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय हे अंगणवाडी, बालकांचे पोषण, महिला व बालकल्याणाशी संबंधित विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे कार्यालय आहे मात्र या कार्यालयात प्रभारी पदभार असल्याने नागरिकांना अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार आहे.

विशेष म्हणजे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलवर नेमप्लेट नसणे, तसेच अधिकारी कोणत्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहणार याबाबतचा फलक नसणे, यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अधिकारी नेमक्या कोणत्या दिवशी कार्यालयात उपलब्ध असतात याची माहिती नागरिकांना मिळत नसल्याने कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रे, सेविका-मदतनीस, बालकांचे पोषण, विविध शासकीय योजना तसेच महिला व बालकांशी संबंधित कामकाजाचा मोठा व्याप आहे. त्यामुळे या कार्यालयाला पूर्णवेळ अधिकारी मिळणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणचा पदभार असल्याचे सांगितले. तसेच यापुढे कार्यालयातील टेबलवर नेमप्लेट लावण्यात येईल आणि दर मंगळवारी कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र आठवड्यातून केवळ एका दिवशी अधिकारी उपलब्ध राहिल्यास नागरिकांच्या विविध अडचणींचे निराकरण वेळेत कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शिरूर अनंतपाळ पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पासाठी पूर्णवेळ बालविकास प्रकल्प अधिकारी नियुक्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande