
अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.)
शेतकरी, आदिवासी आणि विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध
- किसान मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वेताळ
राज्य सरकारचे विशेष लक्ष आदिवासीबहुल मेळघाटाच्या सर्वांगीण विकासाकडे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि आदिवासी समाजाच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांसाठी वीजबिल सवलत, विविध आर्थिक अनुदाने, कर्जमाफीसह कृषी विकासाच्या योजना राबविण्यात आल्या असून, भविष्यातही मेळघाटाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध राहील, असे प्रतिपादन प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा संदेश कृतीतून देत धारणी येथे ‘समग्र सेवा सन्मान सोहळा’ उत्साहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय प्रशिक्षण व शिक्षण प्रसारक मंडळ, धारणी तथा लक्ष्मीकांत (आप्पा) पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विविध शासकीय विभागांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष रामकृष्ण वेताळ, मेळघाटचे आमदार केवलराम काळे, धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे, चिखलदऱ्याचे तहसीलदार जीवन मोराणकर, नायब तहसीलदार राजेश माळी, अनिल कुंडलवाल यांच्यासह आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, महसूल, वन, महावितरण आणि कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाढदिवस फटाक्यांची आतषबाजी, मिरवणुका किंवा अनावश्यक जल्लोष न करता समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्याच विचारधारेतून आप्पा पाटील मित्रमंडळ व राष्ट्रीय प्रशिक्षण आणि शिक्षण प्रसारक मंडळाने समाजासाठी उत्कृष्ट सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला. आमदार केवलराम काळे यांनी समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांचा सन्मान करणे ही प्रेरणादायी बाब असल्याचे सांगितले. समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी