
अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.)। सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापूर यांच्या वतीने दर्यापूर ते भातकुली मार्गावरील आसरा परिसरापर्यंत सुमारे १३ किलोमीटर अंतरावर झाडे लावण्याची मोहीम सुरू आहे. मात्र या झाडांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, शासनाच्या निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली अनेक झाडे पूर्णतः सुकलेली असून त्यामध्ये कुठलाही जीव शिल्लक नसल्याचे दिसून आले. तरीही ही झाडे लागवड झाल्याचे दाखवून शासनाचा व जनतेचा पैसा खर्च केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून हा प्रकार होत असल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.या १३ किलोमीटर मार्गावर तब्बल ४ हजार झाडांची लागवड केली जात असून त्यासाठी मजुरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या सहा ते सात वर्षांपासून दरवर्षी या मार्गावर झाडे लावण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र आजपर्यंत या रस्त्यावर एकही झाड व्यवस्थित वाढलेले किंवा टिकून राहिलेले दिसून येत नसल्याची बाब स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिली.
नागरिकांच्या मते, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार निकृष्ट दर्जाची रोपे लावली जात असल्यामुळे ती काही दिवसांतच सुकून जातात. त्यामुळे झाडे लागवडीच्या नावाखाली केवळ कागदोपत्री कामे करून निधीचा अपव्यय केला जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी अडसूळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी झाडे तोडण्यास शेतकरी जबाबदार असल्याचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे ठेकेदारांकडून निकृष्ट रोपे लावून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवरच आरोप करण्यात येत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. झाडे लागवडीच्या नावाखाली होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री लक्ष देणार का? तसेच जनतेच्या पैशाची होत असलेली उधळपट्टी रोखण्यासाठी शासन कोणती भूमिका घेणार? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी