अमरावती : झाडांची छाटणी झाली; फांद्यांचा कचरा रस्त्यावरच
अमरावती, १० ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवरील झाडांची छाटणी केल्यानंतर त्यातून निर्माण झालेला कचरा उचलण्याकडे महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांच्या कडेला पडलेल्या डहाळ्या, पाने आणि
रस्त्यांवरील झाडांच्या छाटलेल्या फांद्या बेवारस:महापालिकेच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त


अमरावती, १० ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवरील झाडांची छाटणी केल्यानंतर त्यातून निर्माण झालेला कचरा उचलण्याकडे महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. रस्त्यांच्या कडेला पडलेल्या डहाळ्या, पाने आणि फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच नियमित देखभालीचा भाग म्हणून मनपाच्या वृक्ष प्राधिकरणामार्फत शहरातील रस्त्यांवरील धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र, छाटणीचे काम पूर्ण झाल्यानंतर निर्माण झालेला कचरा तातडीने हटविणे अपेक्षित असतानाही अनेक ठिकाणी पाने आणि फांद्या रस्त्यावरच टाकून कर्मचारी निघून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याचे काम एका यंत्रणेकडे, तर छाटणीनंतर रस्त्यावर पडलेला कचरा उचलण्याचे काम दुसऱ्या यंत्रणेकडे सोपविण्यात आले आहे. त्यामुळे छाटणीचे काम झाल्यानंतर कचरा उचलण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून अमरावती-बडनेरा मार्गासह रेल्वे स्टेशन चौक ते एसटी स्टँडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजकांमधील झाडांच्या फांद्या आणि पाने कापण्याचे काम सुरू आहे. मात्र, या कामातून निर्माण झालेला कचरा अद्यापही अनेक ठिकाणी तसाच पडून आहे.

रस्त्यांच्या कडेला पडलेल्या फांद्यांमुळे आधीच अरुंद असलेले रस्ते आणखी संकुचित झाले आहेत. रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसताना दुचाकीस्वारांना या फांद्या दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच वाळलेली पाने आणि फांद्यांमुळे पादचाऱ्यांनाही रस्त्यावरून चालताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नाले तुंबण्याचीही भीती

अनेक दिवस कचरा तसाच पडून राहिल्याने पाने आणि फांद्या कुजण्यास सुरुवात होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होण्यासोबतच डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पावसाच्या पाण्यासोबत हा कचरा नाल्यांमध्ये वाहून गेल्यास नाले तुंबण्याची आणि रस्त्यांवर पाणी साचण्याची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

झाडांची छाटणी करणे आवश्यक असले तरी त्यानंतर निर्माण झालेला कचरा तातडीने उचलण्याची जबाबदारीही महापालिकेचीच आहे. काम अर्धवट सोडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यांवर पडलेला फांद्या-पानांचा कचरा तातडीने हटवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande