


महिनाभरात उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा
रायगड, १० ऑगस्ट (हिं.स.) : कर्जत शहरातील पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, पार्किंग, स्वच्छता, आरोग्य, गटार व्यवस्था, कचरा व्यवस्थापन यांसह तब्बल ५० प्रलंबित नागरी प्रश्नांवर महिनाभरात ठोस कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्जत शहर बचाव समितीने दिला आहे. यासंदर्भात समितीने कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चव्हाण यांना स्मरणपत्र देत प्रशासनाला एक महिन्याची मुदत दिली आहे.
कर्जत शहर बचाव समितीने यापूर्वी २५ सप्टेंबर २०२४ रोजी नागरिकांच्या उपस्थितीत विविध नागरी समस्यांबाबत नगरपरिषदेला निवेदन दिले होते. त्यानंतर १६ डिसेंबर २०२४ पासून लोकमान्य टिळक चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. नगरपरिषदेने २० डिसेंबर रोजी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. त्यानंतर काही प्रश्न मार्गी लागल्याबद्दल समितीने प्रशासनाचे अभिनंदन केले. मात्र, शहरातील अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप कायम असल्याचा दावा समितीने केला आहे.
दूषित पाणीपुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य
शहरातील अनियमित, गढूळ आणि अशुद्ध पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यास समितीने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मंजूर एक्स्प्रेस फिडर तातडीने कार्यान्वित करणे, दर आठ दिवसांनी पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करणे, वाढीव पाण्याच्या टाक्या उभारणे, सर्व भागांत समान दाबाने पाणीपुरवठा करणे, पाण्याची गळती व अनधिकृत जोडण्या रोखणे तसेच नवीन पाणीपुरवठा योजना तातडीने राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर अधिकृत रिक्षा स्टँड, पुरेशी पार्किंग व्यवस्था, टोईंग व्हॅनची सुविधा, नो-हॉकर्स झोनची प्रभावी अंमलबजावणी, चारफाटा येथील सिग्नल कार्यान्वित करणे आणि कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन फ्लायओव्हर तसेच जोडपुलांचे नियोजन करण्याची मागणीही समितीने केली आहे.
स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेचे प्रश्नही प्रलंबित
कचरा व्यवस्थापनात सुधारणा करणे, डंपिंग ग्राउंड हटविणे, सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता, भटक्या कुत्र्यांवर प्रभावी उपाययोजना, भूमिगत गटार व वीज व्यवस्था सुधारणे, शहरात सीसीटीव्ही व्यवस्था वाढविणे, रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे तसेच नागरिकांसाठी प्रभावी तक्रार नोंदणी व्यवस्था सुरू करणे, अशा विविध मागण्यांचा स्मरणपत्रात समावेश आहे.
प्रशासनाने दिलेल्या एक महिन्याच्या मुदतीत हे प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा समितीने दिला आहे. स्मरणपत्राची प्रत रायगड-अलिबाग येथील मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कर्जत पोलीस ठाण्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहितीसाठी देण्यात आली आहे.
यावेळी मुख्याधिकारी चव्हाण, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सुधाकरभाऊ घारे, नितीनदादा सावंत, कर्जत शहर बचाव समितीचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)