सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उपजिल्हाधिकारीपद मंजूर
Deputy Collector post approved for Simhastha Kumbh Mela
Deputy Collector post approved


नाशिक, 10 ऑगस्ट (हिं.स.)। नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात उपजिल्हाधिकारी (वर्ग-अ) संवर्गातील एक पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे. हा शासन निर्णय महसूल व वन विभागाने १६ जुलै २०२६ रोजी निर्गमित केला आहे.

सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले स्वागत अधिकारी (वर्ग-३) हे पद १ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२८ या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपजिल्हाधिकारी (वर्ग-अ) पदामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान देश-विदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मान्यवर आणि विविध शासकीय प्रतिनिधींच्या वाढत्या भेटींचे नियोजन, प्रोटोकॉल व समन्वय प्रभावीपणे करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार एस-२० वेतनश्रेणी लागू राहणार असून, वार्षिक अंदाजित खर्च सुमारे १४.०१ लाख रुपये इतका अपेक्षित आहे. हा खर्च विद्यमान स्वागत अधिकारीपदासाठी उपलब्ध निधीतून भागविण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार हे पद केवळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीपुरतेच अस्तित्वात राहील. दि. ३१ ऑगस्ट २०२८ नंतर हे तात्पुरते पद आपोआप रद्द होऊन त्याऐवजी पूर्वीप्रमाणे स्वागत अधिकारी (वर्ग-३) हे पद पुन्हा कार्यरत राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande