जलसंधारणाच्या कामांना वेग; धाराशिवमध्ये १३ हजार हेक्टर जमीन सुपीक
छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठी गती देण्यात आली आहे. ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तस
जलसंधारणाच्या कामांना वेग; धाराशिवमध्ये १३ हजार हेक्टर जमीन सुपीक


छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार देण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठी गती देण्यात आली आहे. ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ तसेच ‘नालाखोलीकरण व रुंदीकरण’ या योजनांमुळे धरणांमधील गाळ काढून तो शेतांमध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे धरणांची पाणीसाठवण क्षमता वाढत असून, दुसरीकडे शेतजमिनीची सुपीकताही वाढत आहे.

जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पाझर तलाव, साठवण तलाव, लघु प्रकल्प तसेच मोठ्या प्रकल्पांमधील गाळ काढण्याची कामे करण्यात आली आहेत. सन २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत जिल्ह्यातील ३०२ प्रकल्पांतून तब्बल १७०.३८ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. धरणांमधून काढण्यात आलेला हा गाळ ११ हजार ६०७ शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये टाकण्यात आला. त्यामुळे सुमारे १३ हजार १३८ हेक्टर खडकाळ व मुरमाड जमीन सुपीक होण्यास मदत झाली आहे.

पाणीसाठवण क्षमता वाढली; शेतकऱ्यांना आर्थिक लाभ

धरणांमधील गाळ काढल्यामुळे पाणीसाठवण क्षमतेत १३ हजार १५० टीसीएमने वाढ झाली आहे. या योजनेवर आतापर्यंत ६०.४८ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, पात्र शेतकऱ्यांना २४.२३ कोटी रुपयांचे अनुदान आरटीजीएसद्वारे वितरित करण्यात आले आहे.

जलसंधारणाची ही कामे केवळ धरणातील पाणीसाठा वाढविण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीत. मुरमाड व खडकाळ जमिनीवर गाळ टाकल्यामुळे जमिनीची मशागत सुलभ झाली असून, तिची सुपीकता वाढली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होत आहे. नालाखोलीकरणामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.

१६३ गावांत ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’

‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात १६३ गावांची निवड करण्यात आली आहे. कृषी विभाग, जिल्हा परिषद, वन विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक व विकास यंत्रणा तसेच भूजल व जलसंधारण विभागाच्या समन्वयातून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

विशेष निधीअंतर्गत १ हजार ३७४, तर अभिसरणातून ५ हजार ५४५, अशी एकूण ६ हजार ९१९ कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांसाठी ७६.१४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी आजअखेर ६ हजार ६९२ कामे पूर्ण झाली आहेत.

या कामांमुळे जिल्ह्यात सुमारे ३,९१६.८० घनमीटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला असून, ९३८.९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

मृद् व जलसंधारणातून शेतीला नवी ताकद

‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ अंतर्गत सिमेंट नाला बांध, कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर (CCT), खोल सलग समतल चर (Deep CCT), गॅबियन बंधारे, रिचार्ज शाफ्ट आणि नाला खोलीकरण यांसारखी विविध कामे करण्यात येत आहेत.

या कामांमुळे भूजलपातळी आणि सिंचन क्षमता वाढण्यासोबतच मृद् व जलसंधारणाला चालना मिळत आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याचे प्रमाण वाढल्याने विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांना आधार मिळत आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा प्रत्यक्ष परिणाम

धाराशिवसारख्या तुलनेने कमी पर्जन्यमानाच्या आणि दुष्काळप्रवण जिल्ह्यात पाण्याचा प्रत्येक थेंब शेतीसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांकडे केवळ शासकीय योजना म्हणून न पाहता भविष्यातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची गरज म्हणून पाहिले जात आहे.

धरणातील गाळ शेतात आणि पावसाचे पाणी जमिनीत, या दुहेरी प्रक्रियेमुळे जलसाठा वाढ, जमिनीची सुपीकता आणि शेतीचे उत्पादन या तिन्ही आघाड्यांवर सकारात्मक परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande