
धुळे, 10 ऑगस्ट (हिं.स.) | शहरातील जेल रोड परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयांकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करत ते हटविण्याच्या मागणीसाठी हिंदू युवा समितीच्या वतीने जेल रोड परिसरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेत धुळे महानगरपालिकेने सोमवारी, १० ऑगस्ट रोजी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने जेल रोड परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेच्या या कारवाईमुळे जेल रोड परिसरात काही काळ वातावरण चर्चेचे बनले. अतिक्रमण कोणत्याही राजकीय पक्षाचे असो किंवा कोणत्याही व्यक्तीचे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व अतिक्रमणांवर समान पद्धतीने कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.दरम्यान, महापालिकेच्या कारवाईनंतर जेल रोड परिसरातील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार का, याकडे आता धुळेकरांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर