
येवला, १० ऑगस्ट (हिं.स.) : मांजरपाडा प्रकल्प हा येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागासाठी केवळ सिंचनाचा प्रकल्प नसून दुष्काळमुक्तीच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सलग तिसऱ्या वर्षी मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झाले असून, त्यामुळे या भागातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येवल्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपविण्याचा आमचा निर्धार असून, त्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या माध्यमातून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून घेऊन येवल्यासह मराठवाड्यापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी साकारण्यात आलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी सलग तिसऱ्या वर्षी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झाले. या जलप्रवाहाचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, ज्येष्ठ नेते अरुण थोरात, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, शहराध्यक्ष दत्ता निकम, येवला बाजार समितीचे माजी सभापती किसन धनगे, येवला नगरपालिकेचे गटनेते दीपक लोणारी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कमी कालावधीत डोंगरगावपर्यंत पोहोचले पाणी
मांजरपाडा प्रकल्पातील सर्व गेट तसेच अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने पाण्याचा प्रवाह सुरळीत झाला आहे. त्यामुळे यंदा कमी कालावधीत प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचले. या पाण्यामुळे येवला तालुक्यातील दुष्काळग्रस्त उत्तरपूर्व भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही मोठा आधार मिळणार आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे समीर भुजबळ यांनी सांगितले.
नार-पार प्रकल्पाच्या पाण्यासाठी व्यापक नियोजन
मांजरपाडा प्रकल्पामुळे येवल्याच्या दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला असला, तरी भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन व्यापक नियोजन करण्यात येत आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नार-पार प्रकल्पाला गती देऊन त्यातून उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी येवल्यासह मराठवाड्यातील दुष्काळी भागापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पाण्याचा प्रत्येक थेंब दुष्काळी भागाच्या विकासासाठी उपयोगात आणणे आणि त्यातून शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करणे हे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळमुक्त येवला हे प्रमुख उद्दिष्ट
येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागाला अनेक वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पावसाचे अनिश्चित प्रमाण, भूजल पातळीत होणारी घट आणि सिंचनाच्या मर्यादित सुविधा यामुळे शेतकऱ्यांसमोर सातत्याने अडचणी निर्माण होत होत्या. ही परिस्थिती बदलण्यासाठी मांजरपाडा प्रकल्पासह विविध जलसंधारण व सिंचन प्रकल्पांना चालना देण्यात आली आहे.
पाणी उपलब्ध झाल्यास शेतीला बळ मिळते, शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळते आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते. त्यामुळे येवल्याला दुष्काळाच्या संकटातून कायमस्वरूपी बाहेर काढणे हा प्रमुख संकल्प आहे. मांजरपाडा, नार-पार आणि इतर जलप्रकल्पांच्या माध्यमातून येवल्याच्या प्रत्येक दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असा विश्वास समीर भुजबळ यांनी व्यक्त केला.
दरम्यान, मांजरपाड्याचे पाणी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. जलपूजनाच्या कार्यक्रमाला शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
--------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI