लातूरमध्ये एल निनोच्या प्रभावामुळे समाधानकारक पाऊस नाही
लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।अर्धा पावसाळा संपला मात्र अद्याप लातूर जिल्हयातील पाणी टंचाई दूर झाली नाही. आज पर्यंत पडलेल्या पावसामुळे कांही प्रमाणात अधिग्रहणांची संख्या घटली असली तरी आज घडीला १४१ वाडया, तांडे, गावात १९१ अधिग्रणाद्वारे पाणी पुरवठा होत आ
पाणीटंचाई


लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।अर्धा पावसाळा संपला मात्र अद्याप लातूर जिल्हयातील पाणी टंचाई दूर झाली नाही. आज पर्यंत पडलेल्या पावसामुळे कांही प्रमाणात अधिग्रहणांची संख्या घटली असली तरी आज घडीला १४१ वाडया, तांडे, गावात १९१ अधिग्रणाद्वारे पाणी पुरवठा होत आहे. एल निनोच्या प्रभावामुळे जिल्हयात अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पाणीपातळीत वाढ झाली नाही. ग्रामीण भागातील पाणी टंचाई दूर होण्यासाठी दमदार पावसाची नितांत आवश्यकता आहे.

लातूर जिल्हयात मार्च पासून सुरू झालेली पाणी टंचाई अर्धा पावसाळा संपला तरी अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी जिल्हयात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. तसेच नले, आढे, नद्या पूर्णपणे प्रवाहित न झाल्यामुळे सार्वजनीक पाणीपुरवठयाच्या स्त्रोतांना अद्याप पाणी आले नसल्याने खाजगी विहिरींचे अधिग्रहण करून नागरीकांना पाणीपुरवठा सध्या केला जात आहे.

लातूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जुलै ते सप्टेंबर असा तीन महिण्यांसाठी १२ कोटी रूपयांचा विशेष टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. तसेच जिल्ह्यात अपुऱ्या पर्जन्यमानामुळे निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमध्ये आवश्यकतेनुसार खाजगी विहीर किंवा विंधन विहीर अधिग्रहाच्या कालावधीस ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत किंवा पुरेसा पाऊस होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत मुदतवाढदेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी निर्गमित केले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १४१ गावे, वाड्यांमध्ये १९१ विहिरी तथा विंधन विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरू आहे.

जिल्ह्यात जळकोट तालुक्यात सर्वाधिक ४ टँकर व अधिग्रणे सुरू होती. जिल्हयात सर्वाधिक पाऊस जळकोट तालुक्यात पडल्यामुळे त्या तालुक्यातील सर्व अधिग्रहणे व टॅकर प्रशासनाने बंद केले आहेत. जिल्हयात झालेल्या पावसामुळे १६ गावातील व ५ वाडयावरचे २३ अधिग्रहणे प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून बंद केले आहेत.

जिल्ह्यातीला १४१ गावे व वाड्यांना मागणीनुसार व गरजेनुसार १९१ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यात अहमदपूर तालुक्यात ३४ गावे, १२ वाडयासाठी ५५ विहिरीतील पाण्याचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच औसा तालुक्यातील १७ गावे, ६ वाडयासाठी ४१ अधिग्रहणे, निलंगा तालुक्यात ८ गावे, ५ वाडयांसाठी २० अधिग्रहणे, रेणापूर तालुक्यात १६ गावांसाठी १९ अधिग्रहणे, उदगीर तालुक्यात ९ गावे, ७ वाडयांसाठी १६ अधिग्रहणे, शिरूर अनंतपाळ तालुक्यात ६ गावांसाठी १४ अधिग्रहणे, चाकूर तालुक्यात ९ गावे, २ वाडयांसाठी ११ अधिग्रहणे, लातूर तालुक्यातील ८ गावांसाठी ११ अधिग्रहणे, देवणी तालुक्यात २ गावासाठी ४ विहिरींचे अधिग्रहण करून ग्रामीण भागात पाणी पुरवठा केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande