
सोलापूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : समाजाच्या उभारणीत मोलाचे योगदान देऊनही अनेकदा दुर्लक्षित राहिलेल्या घटकांचा सन्मान करण्याचा आगळा उपक्रम वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानतर्फे रविवारी राबविण्यात आला. स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, १२ बलुतेदार तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत श्रमजीवींचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. त्याग, कष्ट आणि सामाजिक योगदानाचा सन्मान करणारा हा सोहळा सोलापूरकरांसाठी भावनिक आणि अभिमानाचा क्षण ठरला.
थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकार महर्षी आणि माजी आमदार कै. वि. गु. शिवदारे अण्णा यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ तसेच ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांपासून ते समाजाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या श्रमजीवींपर्यंत विविध घटकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान स्वीकारताना अनेक सन्मानार्थी तसेच उपस्थितांच्या भावना दाटून आल्या.
सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देऊनही अनेकदा उपेक्षित राहणाऱ्या घटकांचा अशा पद्धतीने सार्वजनिक गौरव करण्याचा हा उपक्रम सोलापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष ठरला. या उपक्रमाचे उपस्थितांकडून आणि विविध स्तरांतून कौतुक करण्यात आले.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सर्व सन्मानार्थींचे कौतुक केले. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनीही उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी डॉ. पवार यांनी सोलापूरच्या सामाजिक व ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतला.
कार्यक्रमास वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सन्मानार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड