
लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याच्या उद्देशाने जेएसपीएम लातूरद्वारा संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय, विद्यालयाचा स्काऊट अँड गाईड समूह आणि ग्रीन वृक्ष लातूर टीम यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या बीज गोळे निर्मिती उपक्रमाला पुढील टप्प्यात प्रत्यक्ष वृक्षनिर्मितीची जोड देण्यात आली. विद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बीज गोळ्यांचे संजीवनी बेट, वडवळ नागनाथ ता. चाकूर, जि. लातूर येथे रोपण करण्यात आले.
या उपक्रमात प्राचार्य गोविंद शिंदे, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, स्काऊट गाईड विभाग प्रमुख अलका अंकुशे, विनोद सूर्यवंशी, विद्यावर्धिनी गायकवाड, प्रशांत कांबळे, आक ाश अवसकर तसेच विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून समजावे आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी केवळ शासन किंवा सामाजिक संस्थांची नसून प्रत्येक नागरिकाची आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. बीज गोळ्यांच्या माध्यमातून विविध झाडांच्या बियांचे संरक्षण
करून त्या योग्य ठिकाणी रुजण्यास केले. अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी ग्रीन वृक्ष लातूर टीमच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बीज गोळ्यांचे महत्त्व, त्यांची निर्मिती, योग्य ठिकाणी रोपण करण्याची पद्धत तसेच भविष्यातील वृक्षनिर्मितीमध्ये अशा उपक्रमांची भूमिका याबाबत मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाबद्दलची आस्था निर्माण करून त्यांना पर्यावरणाचे जबाबदार नागरिक घडविण्याच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. आज तयार केलेला एक बीज गोळा भविष्यात एका वृक्षाचे रूप धारण करू शकतो आणि अनेक पिढ्यांना सावली, प्राणवायू व पर्यावरणीय समृद्धी देऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने निसर्ग संवर्धनात योगदान देणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. 'आजचा एक बीज गोळा म्हणजे उद्याचा एक हिरवागार वृक्ष; आणि आजची विद्यार्थ्यांची पर्यावरणविषयक कृती म्हणजे उद्याच्या शाश्वत भविष्याची पायाभरणी,' या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला.
प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा अनुभव
विद्यालयात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने बीज गोळ्यांची निर्मिती केली होती. माती, सेंद्रिय घटक आणि विविध वृक्षांच्या बियांचा वापर करून तयार करण्यात आलेले हे बीज गोळे निसर्गाच्या सान्निध्यात पोहोचविण्यात आले. संजीवनी बेट परिसरात या बीज गोळ्यांचे रोपण करताना विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये 'वृक्ष लावा, वृक्ष जगवा' यासोबतच जैवविविधतेचे संवर्धन, मातीचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मिती याबाबत जागरूकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकातून पर्यावरणाचा अभ्यास न करता प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण संवर्धनाचा अनुभव घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis