
टी. एम. नगरमध्ये सुमारे ३ हजार देशी व औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण
१९ प्रभागांतील २५ जागांचा होणार हरित विकास
जळगाव, १० ऑगस्ट (हिं.स.) : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहराचा शाश्वत व पर्यावरणपूरक विकास साधण्यासाठी महानगरपालिकेने ‘हरित जळगाव शहर’ या संकल्पनेतून प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे. धुळे-भुसावळ महामार्गालगतच्या टी. एम. नगर येथील मोकळ्या जागेत सुमारे तीन हजार देशी व औषधी गुणधर्म असलेल्या रोपांची लागवड करण्यात आली.
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, महानगरपालिका सभापती चंद्रशेखर पाटील, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनीषा घाटगे, विविध प्रभागांचे नगरसेवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच नागरिक उपस्थित होते.
१९ प्रभागांतील २५ जागांची निवड
‘हरित जळगाव शहर’ उपक्रमांतर्गत महानगरपालिकेने शहरातील १९ प्रभागांमध्ये २५ जागा हरित क्षेत्र विकासासाठी निश्चित केल्या आहेत. या ठिकाणी केवळ वृक्षारोपण करण्याऐवजी लावलेली झाडे जगविणे, स्थानिक प्रजातींची निवड, खुल्या जागांचे संरक्षण आणि जलसंधारणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासोबतच शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.
जळगाव शहरासाठी तयार करण्यात आलेल्या हीट ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून उष्णतेचा अधिक धोका असलेल्या भागांचा तसेच त्या भागांची उष्णतेशी जुळवून घेण्याची क्षमता यांचा अभ्यास केला जात आहे. या अभ्यासाच्या आधारे भविष्यात आवश्यक त्या उपाययोजना आखण्यात येणार आहेत.
मियावाकी पद्धतीने वाढणार
शहराची हिरवाई
टी. एम. नगर येथील खुल्या जागेत मियावाकी पद्धतीसह नक्षत्र उद्यानाची संकल्पना राबविण्यास सुरुवात झाली आहे. या ठिकाणी विविध प्रकारच्या सुमारे तीन हजार देशी प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या माध्यमातून शहरातील मोकळ्या जागांना हिरवाईची किनार देण्यासोबतच जैवविविधतेला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
टी. एम. नगर येथून सुरू झालेली ही हरित मोहीम महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या वृक्षांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करण्यावर विशेष भर देण्यात येणार असल्याने ‘हरित जळगाव’च्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळणार आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर