
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट (हिं.स.) : स्लोव्हेनियाची राजधानी ल्युब्लियाना येथील भारतीय दूतावासाच्या परिसराचे भारतविरोधी आणि खलिस्तानींकडून नुकसान करण्यात आलेय. या घटनेचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र निषेध केला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, व्हिएन्ना करारानुसार राजनैतिक परिसराच्या अखंडतेचा भंग करता येत नाही आणि अशा परिसरांची सुरक्षा करणे संबंधित देशाचे कर्तव्य आहे. या घटनेची गंभीर दखल घेत भारताने स्लोव्हेनियन अधिकाऱ्यांकडे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, ल्युब्लियाना येथील भारतीय दूतावासाच्या परिसराला भारतविरोधी घटकांकडून नुकसान पोहोचविण्यात आले असून, भारताने या निंदनीय कृत्याचा निषेध केला आहे. या प्रकरणी नवी दिल्ली तसेच ल्युब्लियाना या दोन्ही ठिकाणी स्लोव्हेनियन अधिकाऱ्यांकडे ठामपणे मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
दूतावासाच्या भिंती आणि फलकांवर भारतविरोधी घोषणा तसेच आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामागील दोषींना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारताने केली आहे.दरम्यान, अशा प्रकारचे गट द्वेषपूर्ण प्रचार आणि चुकीची माहिती पसरवत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे इतर देशांतील कायदा अंमलबजावणी यंत्रणांनीही अशा प्रचाराकडे आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या प्रसाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन भारताने केले आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी