अमरावतीत कामगार-किसान मोर्चाचे ‘जेलभरो’; हजारो कामगार-शेतकरी रस्त्यावर
अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.) कामगार, कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संयुक्त कामगार संघटना कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार ‘जेलभरो’ आंदोलन करण्यात आले. चारही श्रमसंहिता रद्द करण्या
अमरावतीत कामगार-किसान मोर्चाचे ‘जेलभरो’; हजारो कामगार-शेतकरी रस्त्यावर


अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.)

कामगार, कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संयुक्त कामगार संघटना कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार ‘जेलभरो’ आंदोलन करण्यात आले. चारही श्रमसंहिता रद्द करण्यासह तब्बल १६ मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात कामगार आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत सरकारचा निषेध केला.या आंदोलनात किमान ३० हजार रुपये वेतन लागू करावे, जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे, महागाईवर नियंत्रण आणावे, कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करावे आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच चार श्रमसंहितांमुळे कामगारांचे अधिकार धोक्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलकांची मोठी गर्दी झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. केंद्र सरकारच्या कामगार व शेतकरीविरोधी धोरणांविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळावा, वाढती महागाई कमी करावी तसेच रोजगार आणि सामाजिक सुरक्षेच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संयुक्त कामगार संघटना कृती समिती आणि संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला.“मागण्या मान्य झाल्या नाहीत तर देशभर व्यापक जनआंदोलन उभारू,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande