जरांगेंच्या भूमिकेवर लक्ष्मण हाकेंचा पलटवार; ‘ओबीसींचे आरक्षण संपले’
सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। कुणबी समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची हाक देत पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. सोलाप
laximan Hakke


सोलापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

कुणबी समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची हाक देत पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. सोलापूर दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. त्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यासह सरकार आणि जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही टीका केली.

“राज्यातील ओबीसी आरक्षण संपले आहे की नाही, हे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले पाहिजे. राज्यभरात मनोज जरांगे जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. महसूलमंत्र्यांना मी गिनत नाही, असे दाखवले जात आहे. ही दहशतीची भाषा आहे,” असा आरोप हाके यांनी केला.

शासनकर्त्यांमध्ये मोठ्या संख्येने ओबीसी समाजातील लोक निवडून आले असल्याचा दावा करत त्यांनी “मूळ ओबीसी कुठे आहेत?” असा सवाल उपस्थित केला. मराठा-कुणबी समाजाच्या प्रमाणपत्रांमुळे ओबीसींच्या जागांवर परिणाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बोलताना हाके म्हणाले की, काही प्रमाणपत्रे रद्द झाल्यानंतर जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत आहेत. मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांबाबत वापरल्या जाणाऱ्या भाषेवरही त्यांनी आक्षेप घेतला.

“मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली जाते, महसूलमंत्र्यांच्या व्यंगावर बोलले जाते. राज्यातील पुरोगामी कुठे गेले? हा वर्णभेद नाही का?” असा सवाल त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही जरांगे पाटील यांच्याकडून टीका होत असल्याचे सांगत हाके यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राने अत्रे आणि ठाकरेंची राजकीय भाषा पाहिली आहे; मात्र जरांगे यांच्या वक्तव्यांमुळे वेगळ्या प्रकारची भाषा राजकारणात आली असल्याची टीका त्यांनी केली.

मंत्री विखे पाटील आणि उदय सामंत यांना उद्देशून “तुम्ही त्यांना किती वेळा भेटायला जाणार?” असा सवालही हाके यांनी उपस्थित केला. तसेच आमदार शिरसाट यांच्या फोन कॉल्सचा संदर्भ देत सर्वांसाठी समान राजकीय निकष आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande