स्वातंत्र्यदिनी अमरावतीत ‘महारक्तदान’ अभियान
मद्यविक्रेता संघटना व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उपक्रम २ हजार रक्तपिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ट अमरावती, १० ऑगस्ट (हिं.स.) : थॅलेसेमिया, सिकलसेल ॲनिमिया, हिमोफिलिया तसेच रक्ताच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना सातत्याने र
स्वातंत्र्यदिनी मद्यविक्रेता संघटनेचे महारक्तदान शिबीर:जिल्ह्यात दोन ठिकाणी आयोजन, 2 हजार बॉटल्सचे लक्ष्य


मद्यविक्रेता संघटना व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उपक्रम

२ हजार रक्तपिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ट

अमरावती, १० ऑगस्ट (हिं.स.) : थॅलेसेमिया, सिकलसेल ॲनिमिया, हिमोफिलिया तसेच रक्ताच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना सातत्याने रक्ताची आवश्यकता भासते. या रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने अमरावती जिल्हा मद्यविक्रेता संघटना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून तब्बल २ हजार रक्तपिशव्या संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

हे महारक्तदान शिबिर अमरावती शहर आणि धारणी अशा दोन ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. अमरावती शहरातील शिबिर कॅम्प परिसरातील हॉटेल ग्रँड महफीलच्या रुबी हॉलमध्ये होणार आहे. तर धारणी येथील शिबिर उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या माध्यमातून योग्य ठिकाणी आयोजित केले जाणार आहे.

मद्यविक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक नितीन देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. या दोन्ही शिबिरांमध्ये संघटनेचे पदाधिकारी, विविध मद्यविक्री केंद्रांवरील कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

दोन्ही रक्तदान शिबिरांना सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. अमरावती शहरातील शिबिर मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणार असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय, पीडीएमएमसी, गोडे कॉलेज येथील रक्तपेढ्यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्तपेढीचे अधिकारी-कर्मचारी रक्तसंकलनासाठी सहकार्य करणार आहेत. याशिवाय नागपूर येथील रेनबो रक्तपेढीचे अधिकारी व कर्मचारीही या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

या महारक्तदान शिबिराच्या आयोजनावेळी जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांच्यासह संघटनेचे सचिव सचिन हिवसे, सागर भेटाळू, उपाध्यक्ष अनिल भामोरे, विजय जयस्वाल, सुरेश चांदवानी आणि दीपक गुडधे आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी रक्ताची गरज भागविण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande