आमदार कल्याणशेट्टी यांना जीवे मारण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप; दोघांविरुद्ध गुन्हा
सोलापूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : विद्यमान आमदार श्री. कल्याणशेट्टी यांना गोळी घालून जीवे मारण्यासाठी एका व्यक्तीला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात ख
Sachin Klaynaseti solpaur


सोलापूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : विद्यमान आमदार श्री. कल्याणशेट्टी यांना गोळी घालून जीवे मारण्यासाठी एका व्यक्तीला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, हा प्रकार सोलापुरातील महावीर चौक परिसरात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी महावीर चौक परिसरातील रहिवासी आनंद स्वामीराज सुरवसे यांनी सदर बाजार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, संबंधित आमदार खरेदीसाठी प्युमा शोरूममध्ये गेले होते. खरेदी केल्यानंतर ते शोरूमबाहेर थांबले असताना आरोपी त्यांच्याजवळ आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यावेळी आरोपी क्रमांक एक याने तक्रारदाराला पैशांचे आमिष दाखवून आमदारांना गोळी घालून ठार करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपी क्रमांक दोन यानेही संबंधित व्यक्तीला उद्देशून, ‘साहेब काय म्हणतात ते नीट ऐक, त्यात तुझा फायदा आहे,’ असे सांगत आमदारांना जीवे मारण्यासाठी प्रवृत्त केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी श्रीशैल हुलळी आणि फुलारी, रा. सोलापूर यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ६५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास सपोनि सावंत करीत आहेत. दरम्यान, तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रियेत आरोप सिद्ध होईपर्यंत संबंधित व्यक्तींना दोषी मानता येणार नाही.

आमदारांना जीवे मारण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या गंभीर आरोपामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande