
शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न
बीड, १० ऑगस्ट (हिं.स.) : बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या दुग्ध व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकण्यात आले आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी रिलायन्स रिटेलचे वरिष्ठ अधिकारी श्री. विनय अध्याय यांची मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे भेट घेऊन दुग्ध व्यवसाय आणि दुग्धजन्य उत्पादनांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान दूध व दुग्धजन्य पदार्थांसह विविध खाद्यपदार्थ तसेच ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांची माहिती आमदार धस यांनी घेतली. यासोबतच दुग्ध व्यवसायाची सद्यस्थिती, उत्पादनांची गुणवत्ता, बाजारपेठेतील संधी आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा याबाबतही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
रिलायन्स रिटेलसारख्या देशातील मोठ्या आणि व्यापक रिटेल क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून उत्पादित होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी, दर्जेदार उत्पादन आणि ग्राहकांना उत्तम गुणवत्तेची उत्पादने यांच्यात अधिक प्रभावी समन्वय कसा साधता येईल, यावरही चर्चा झाली.
दुग्ध व्यवसायाच्या विस्तारासोबतच शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ, योग्य दर आणि आधुनिक व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या दृष्टीने झालेली ही भेट आणि चर्चा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.
यावेळी वैभव आंधळे यांच्यासह मॉल व्यवस्थापक आणि रिलायन्स रिटेलची टीम उपस्थित होती.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis