
बीड, 10 ऑगस्ट (हिं.स.)जालना रोड ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचा आणि नालीचा वर्षानुवर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागत आहे. बीड शहराच्या प्रथम नागरिक, नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे व मुख्याधिकारी मांडुरके यांच्या उपस्थितीत तब्बल २ कोटी रुपयांच्या सिमेंट रस्ता व नालीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. आमदार विजयसिंह पंडित यांनी या संदर्भात माहिती दिली.
आमदार पंडित म्हणाले,स्टेडियम परिसरातील हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, पावसाळ्यात पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नागरिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या भागातील नागरिकांनी रस्ता आणि नालीचे काम पाण्याची योग्य पातळी (लेव्हल) घेऊनच करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार, छत्रपती संभाजीनगर येथील त्रयस्थ संस्थेमार्फत पाण्याची पातळी तपासण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून स्टेडियमसमोरून, जालना रोडमार्गे मोंढा कॉर्नर आणि पुढे बिंदुसरा नदीच्या पात्राकडे पाण्याचा योग्य निचरा होईल, अशा पद्धतीने हे काम करण्यात येणार आहे.
विकासकामे झाली पाहिजेत, पण ती दर्जेदार, नियोजनबद्ध आणि शाश्वत असली पाहिजेत, हा आमचा प्रयत्न आहे. आज सुरू झालेले हे काम पूर्ण झाल्यानंतर स्टेडियम परिसरासह या मार्गावरून ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी नगराध्यक्षांचे प्रतिनिधी शेख मुजीब, सभापती शेख निजाम, सभापती बाळासाहेब गुंजाळ, नगरसेवक दिनेश मुंदडा, नगरसेवक दत्ता जाधव, नगरसेवक शेख बिलाल, नगरसेवक जयतुल्ला खान, महेश राऊत, शेख इकबाल आणि संतोष जाधव यांच्यासह पालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis