
कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर येथे सप्टेंबरमध्ये भरती प्रक्रिया
पुणे, १० ऑगस्ट (हिं.स.) : सशस्त्र दलातील भूतपूर्व सैनिक तसेच राज्य वन विभागातील भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी १३६ इन्फंट्री बटालियन इको महार अंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा १ ते ४ सप्टेंबर २०२६ दरम्यान कोल्हापूर येथील १०९ इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा लाईट इन्फंट्री येथे होणार आहे. दुसरा टप्पा ८ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील एआरओ ग्राउंड येथे होणार असून, दोन्ही ठिकाणी भरती प्रक्रिया सकाळी ५ वाजता सुरू होईल.
विविध पदांसाठी भरती
या भरतीमध्ये जेसीओ – ४, सोल्जर (जीडी) – १६२ पदे केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. तसेच ट्रेड्समन – १५ पदांमध्ये सोल्जर क्लार्क (जीडी) – ७, हेअर ड्रेसर – ९, मेस कीपर – १, स्टीवर्ड – १, हाऊस कीपर – १ आणि शेफ कम्युनिटी – २ अशा पदांचा समावेश आहे. ट्रेड्समन पदांसाठी संपूर्ण भारतातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
कोणाला मिळणार संधी?
भरतीसाठी उमेदवार सशस्त्र दलातील भूतपूर्व सैनिक (निवृत्तीवेतनधारक) तसेच वने व हवामान बदल मंत्रालय (MoEF&CC) आणि राज्य वन विभागात किमान २० वर्षे सेवा केलेले भूतपूर्व महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे.
भूतपूर्व सैनिक व भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी किमान वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, सेवानिवृत्ती किंवा सेवामुक्तीच्या तारखेपासून भरतीच्या तारखेपर्यंत पाच वर्षांच्या आत नोंदणी होणे आवश्यक आहे. उमेदवार कोणत्याही दिवाणी अथवा फौजदारी प्रकरणात सहभागी नसावा. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
ही कागदपत्रे आवश्यक
उमेदवारांनी मूळ निवृत्तिवेतन आदेश (PPO), डिस्चार्ज बुक, अधिवास प्रमाणपत्र, भूतपूर्व सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड तसेच त्यांच्या स्वयंसाक्षांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. याशिवाय अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचे १० छायाचित्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे आवश्यक आहेत.
भूतपूर्व सैनिक जेसीओना ५५ वर्षांपर्यंत, तर भूतपूर्व सैनिक शिपायांना ५० वर्षांपर्यंत सेवा करता येणार आहे. भरती मेळाव्यादरम्यान उमेदवारांना मोबाईल फोन बाळगण्यास परवानगी असणार नाही.
भरतीबाबत अधिक माहितीसाठी ९१६८१६८१३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर एस. फिरासत यांनी केले आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु