
छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : बदनापूर येथील पाथ्रीकर महाविद्यालयाचा २९ वा वर्धापन दिन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
दीपप्रज्वलन आणि महाविद्यालयाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक तथा सरपंच भास्करराव पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ पाथ्रीकर, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष भीमराव पाटील जावळे, डॉ. देवेश पाथ्रीकर, डॉ. शेख यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis