
बीड, 10 ऑगस्ट (हिं.स.)मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड कॉमर्सच्या महासचिवपदी परळीचे भूमिपुत्र संदीपसेठ लाहोटी तसेच अध्यक्षपदी सुरेंद्र रेदासनी यांची निवड झाल्याबद्दल विविध व्यापारी महासंघ, परळी वैजनाथ यांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी व्यापारी बांधवांशी संवाद साधला. “व्यापारी हे केवळ व्यापार करणारे घटक नसून शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
परळीची व्यापारपेठ अधिक सक्षम व विस्तारली पाहिजे, नवउद्योजकांना संधी मिळाली पाहिजे, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती झाली पाहिजे आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे, यासह व्यापारी क्षेत्रासमोरील विविध आव्हाने व भविष्यातील संधींबाबत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
परळीच्या भूमिपुत्राची मराठवाडा स्तरावरील महत्त्वाच्या जबाबदारीवर झालेली निवड ही संपूर्ण परळीकरांसाठी अभिमानाची बाब आहे. संदीपसेठ लाहोटी आणि सुरेंद्रजी रेदासनी यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
या कार्यक्रमाला व्यापारी महासंघांचे पदाधिकारी, व्यापारी बांधव तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis