
आमदार संजय खोडके, सुरेखा ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन
अमरावती, १० ऑगस्ट (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना अंतर्गत गटबाजीचा फटका सामान्य कार्यकर्त्यांना बसतो, हा अनुभव आपण स्वतः घेतला आहे. त्यामुळे आमदार संजय खोडके आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्यातील मतभेद बाजूला ठेवून दोघांनीही एकत्र यावे. राष्ट्रवादी काँग्रेसला अखंड ठेवत जिल्ह्यात मजबूत संघटन उभे करावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निखिल ठाकरे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे प्रथमच अमरावतीत आगमन झाले. यानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शहरातील विविध ठिकाणी अभिवादन आणि स्वागत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
निखिल ठाकरे यांनी सर्वप्रथम इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुढे गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे, जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निखिल ठाकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी बोलताना संतोष महात्मे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना अंतर्गत गटबाजीमुळे सामान्य कार्यकर्त्यांची मोठी अडचण होते. पक्षाची खरी ताकद ही कार्यकर्त्यांच्या एकजुटीत आहे. त्यामुळे नेतृत्वातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
आमदार संजय खोडके आणि सुरेखा ठाकरे यांनीही आपापले मतभेद विसरून एकत्र बसावे आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मजबूत संघटन उभे करावे, अशी अपेक्षा महात्मे यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांच्या हितासाठी आणि पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी