
रायगड, 10 ऑगस्ट (हिं.स.)। जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पुरवठ्याचा ठेका जळगाव येथील कंपनीला देण्यात आल्याने रायगडमधील स्थानिक पुरवठादारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात पुरवठा करण्यासाठी स्थानिक यंत्रणा उपलब्ध असतानाही परजिल्ह्यातील कंपनीची निवड का करण्यात आली, असा सवाल उपस्थित होत आहे. विशेषतः जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील शाळांपर्यंत पोषण आहार वेळेत पोहोचणार का, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना सकस आहार उपलब्ध करून देण्यासाठी शाळांमध्ये धान्य व धान्यादी मालाचा पुरवठा केला जातो. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये जून-जुलै २०२६ या कालावधीतील ४० दिवसांसाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ई-निविदा प्रक्रियेतून जळगाव येथील श्रीसाई मार्केटिंग अॅण्ड ट्रेडिंग कंपनीची पुरवठादार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, ५ ऑगस्ट रोजी संबंधित कंपनीला पुरवठ्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
रायगड जिल्ह्यात तब्बल २ हजार ४७३ जिल्हा परिषद शाळा असून, सुमारे ७३ हजार विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात. पोलादपूरपासून पनवेलपर्यंत जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. अनेक शाळा डोंगराळ भागातील गाव-वाड्यांमध्ये असल्याने तेथे साहित्य पोहोचविण्यासाठी स्थानिक यंत्रणा महत्त्वाची ठरते. त्यामुळे जळगावच्या कंपनीकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरवठा वेळेत पूर्ण होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
पुरवठ्यात विलंब झाल्यास संबंधित कंपनीवर कारवाईची तरतूद आदेशात आहे. मात्र, प्रत्यक्षात शाळांमध्ये साहित्य वेळेत पोहोचले नाही तर जबाबदारी कोणाची, असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
“ई-निविदा प्रक्रियेतून कंपनीची निवड झाली असून, त्यानुसार जळगावमधील कंपनीला पोषण आहार पुरवठ्याचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)